MPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा काळ्या पट्ट्या लावून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निदर्शने
कोरोना काळात अधिवेशन चालते तर मग MPSC च्या परीक्षा का नाही ? आमदार जोरगेवार यांचा प्रश्न
MPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आला त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केले त्याचाच एक भाग म्हणून यंग चांदा ब्रिगेड व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथील गांधी चौक येथे काळ्या पट्ट्या लावून निदर्शने केले यावेळी आमदार जोरगेवार यांनी या ठिकाणी भेट दिली.
याआधी सुद्धा तीनदा परीक्षा रद्द करण्यात आली व आज चौथ्यांदा ऐंन वेळेवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष व्यक्त केल्या जात आहे. हा घेतलेला निर्णय रद्द करून ठरलेल्या वेळेवर परीक्षा घेण्यात यावे याकरिता आमदार जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना MPSC परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेण्यासाठी पत्र पाठवून विनंती केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे आयोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१९ परीक्षा हि १४ मार्च २०२१ ला नियोजित होती. परंतु आधीच सदर परीक्षेला चार वेळा स्थगिती देऊन पुढे ढकलण्यात आली. केंद्रीय पातळीवरील परीक्षा ( UPSC, SSC, NTPC, IBPS, व इतर तत्सम परीक्षा ) कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेले नियम व अटी पाळून नियोजित वेळी योग्य पध्दतीने घेण्यात आल्या आणि त्यांचे निकाल नियोजित वेळेतच लागले आहे. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे आयोजित राज्यसेवा परीक्षा वारंवार पुढे ढकलत आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने हा घेतलेला निर्णय त्वरित मागे घेवून ठरलेल्या वेळेतच परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार जोरगेवार यांनी केली आहे.