बचत गटाच्या महिलांना मिळाले वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे
जागतिक महिला दिनानिमित्त अंनिसचे आयोजन
चंद्रपूर:- जागतिक महिला दिनानिमित्त अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जनवादी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने दाताळा येथे बचत गटाच्या महिलांसाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात महिला आणि अंधश्रद्धा, महिला आणि मानसिक आरोग्य, महिला सक्षमीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, महिला संघटिका रजनी कार्लेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश पिंजरकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अंनिसचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश पाझारे, मंगेश नैताम, पूर्णिमा बलवीर, अविनाश बलवीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम व आनंदी होण्यासाठी जीवनातील सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला दाताळा परिसरातील बचत गटांच्या महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता कुळे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन ललिता क्षीरसागर यांनी केले.