अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ उकलले आहे. मी एटीएसमधील सर्व सहकाऱ्यांना सलाम करतो. त्यांनी मागील काही दिवस रात्रं-दिवस काम करून या प्रकरणाचा शोध घेतला. माझ्या पोलिस करिअरमध्ये हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात अवघड राहिले आहे, अशी फेसबुक पोस्ट एटीएसचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी टाकली आहे. हे प्रकरण आपल्या करिअरमधील सर्वाधिक अवघड प्रकरण असल्याचे शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे.
सचिन वाझेच्या सांगण्यावरून विनायक शिंदे याने आज अटक करण्यात आलेला बुकी व इतर काहींना एकत्रित केल्याचा एटीएसला संशय आहे. तसेच हिरेन यांना तावडे म्हणून फोन करणाराही शिंदे हाच असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याच्या कटातही शिंदेच्या सहभागाबाबत तपास केला जात आहे.
लखनभैया बनवाट चकमक प्रकरणात प्रमुख आरोपी प्रदिप सुर्यवंशी याच्यासह विनायक शिंदेही दोषी आढळला. पोलिस हवालदार असलेल्या शिंदेला त्यानंतर सेवेतून निलंबित करण्यात आले. नोव्हेंबर 2006 मध्ये ही चकमक झाली होती. वाझे, सुर्यवंशी व शिंदे या तिघांनीही एकत्रित काम केले आहे. शिंदे हा मे 2020 पासून पॅरोलवर बाहेर आहे.