महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर झालेले गंभीर आरोप, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांचे पत्र याबाबत आज नागपूर येथे माध्यमांशी विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांनी संवाद साधला. या पत्रपरिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे असे :
- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता.
- तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. मुळात सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकासारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते.
- त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून काही फोन सर्व्हिलन्सवर होते. त्यातून जितके गंभीर प्रकार पुढे आले, ते फारच स्फोटक आहेत. बदल्यांचे एक मोठे रॅकेट आढळून आले. सुबोध जयस्वाल यांची तर बदली होणार नव्हती, ते या भ्रष्ट कारभाराला कंटाळून केंद्रात गेले.
- ही दलाली आणि लाचखोरी तेव्हाच थांबविली गेली असती, तर आज हा प्रसंग आला नसता. माझ्या माहितीप्रमाणे या दलालीचा संपूर्ण रिपोर्ट सरकारच्या रेकॉर्डवर इनवर्ड झालेला आहे.
- परमवीर सिंग यांच्या अध्यक्षतेतील कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला श्री शरद पवार विसरले.
- परमवीरसिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे (ब्रिफिंग) सांगितले आहे. मग मुख्यमंत्री का बोलत नाहीत? परमवीरसिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे.
- गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब?
कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात.
या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे.
- सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे.
- ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत.
पण, शरद पवार यांनी सूचविल्याप्रमाणे ते केवळ परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा?
थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी 15-20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का.
- अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे.
हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. याची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीत झाली पाहिजे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही.
- सरकारचे कसे आहे... आम्ही भ्रष्टाचार करू, दुराचार करू, अनाचार करू.
फक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू.
आता अशा वाक्यांची आता आम्हाला सवय. त्याने फार काही फरक पडत नाही!