गोंदिया -चंद्रपूर- बल्लारशा रेल्वे गाडी सुरु करा- नवेगावकरांची मागणी
जब्बलपुर-चंद्रपूरचाही थांबा हवा
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.21 मार्च:-
गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे गाडी लवकरात लवकर सुरू करावी, तसेच जबलपूर -चंद्रपूर या गाडीचा थांबा देवलगाव (नवेगावबांध) येथे देण्यात यावे. अशी मागणी नवेगावबांध येथील रहिवाशांनी देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. नवेगावबांध व परिसरातील नागरिकांनी हे निवेदन गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अनिल देशमुख, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे ,नागपूर रेल्वे विभागाचे डीआरएम यांनाही दिले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या जबलपूर-चंद्रपूर या रेल्वे गाडीचा थांबा देवलगाव (नवेगावबांध) येथे देण्याची आग्रही विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन देवलगाव येथे तीन रोड (पटरी) ची सुविधा असून, दोन प्लेटफार्म ची व्यवस्था आहे. त्याबरोबरच दोन्ही बाजूला चढण्या- उतरण्यासाठी ओवर ब्रिज सुद्धा तयार झाले आहे. नवेगावबांध गावालगत रेल्वेस्टेशन देवलगाव या नावाने असून, येथे राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प तसेच पक्षी अभ्यासासाठी देशातून व विदेशातून लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. त्याबरोबरच पर्यटनासाठी इटियाडोह धरण, झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प, पर्यटन संकुल, चारशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेले नवेगाव बांध जलाशय, नवोदय विद्यालय आहे.तसेच सुप्रसिद्ध प्रतापगड तिबेटी वसाहत, बंगाली वसाहत, आदिवासीबहुल ग्रामीण क्षेत्र परिसर आहे. राज्य व केंद्र शासनाचे पर्यटनाचा विकास व पर्यटनात वाढ करणे असे धोरण आहे.नवेगावबांध हे धान्य ,तांदूळ याचे मोठे व्यापारी केंद्र असून, याठिकाणी हेलिपॅड ची सुद्धा व्यवस्था आहे. या रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यास पर्यटकांना येण्या जाण्याकरता रेल्वे सुविधा चा लाभ मिळणार आहे. तसेच पर्यटन वृद्धि सुद्धा होईल.गेल्या वर्षभरापासून लॉक डाऊन मुळे या मार्गावरील रेल्वे सुविधा ठप्प झाली आहे . त्यामुळे परिसरातील नागरिकांची फारच गैरसोय व कुचंबणा होत आहे.गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून, अनेक कामासाठी स्थानिक व परिसरातील नागरिकांना गोंदिया ला जावे लागते. अर्जुनी मोरगाव या आदिवासी व नक्षलग्रस्त तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी नागरिकांना वारंवार जावे लागते .रेल्वे तिकीट दराच्या चारपट भाडे बसच्या तिकीटासाठी किंवा खाजगी वाहनांसाठी प्रवाश्यांना द्यावे लागते. त्यामुळे जास्तीचा आर्थिक भुर्दंड परिसरातील प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. या लॉकडाऊनच्या काळात बरीचआर्थिक झळ नागरिकांना बसलेली आहे. प्रवासाची मुबलक सुविधा नसल्यामुळे गोंदिया- चंद्रपूर-बल्लारशहा या रेल्वे गाडीचे नियमित सेवा देखील लवकरात लवकर सुरू करावी. अशी विनंती ग्रामवासी व परिसरातील नागरिकांनी या निवेदनातून केली आहे.