अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही, अशी परखड टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत पनवेल येथे बोलताना केली.
मा. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज उरण, पनवेल आणि खारघर याठिकाणी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका पार पडल्या. यावेळी माजी खासदार ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनंद पटवर्धन, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश सोनी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर उपस्थित होते.
ते म्हणाले की, राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत आहेत. नुकतेच मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे? महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदना नसलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले. या सरकारचे भीषण स्वरूप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था तर ‘न घर का न घाट का’, अशी झाली आहे, असा टोला त्यांनी हाणला.