कोविड 19 लसीकरण केंद्राचे बोंडगावदेवी,भिवखिडकी येथे शुभारंभ
कुपोषित बालकांना औषधाचे वाटप
कोरोना तपासणीला व लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.27 मार्च:-
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटी अंतर्गत बोंडगावदेवी उपकेंद्रात 27 मार्च रोज शनिवार पासून covid-19 लसीकरण सुरू झाले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य कमलताई पाऊलझगडे यांच्या हस्ते माजी पंचायत समिती सदस्य ब्राह्मणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. बोंडगाव देवी येथील जेष्ठ नागरिक विठ्ठलराव नेवारे यांना यावेळी पहिली लस देण्यात आली.भिवखिडकी उपकेंद्रातही कोरोना लसीकरण केंद्र आज सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर चाळीस लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर बोंडगाव देवी येथे 120 ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले, तर प्राथमिक आरोग्य केंद्र चान्नाबाकटी येथे 40 जेष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. या तिन्ही ठिकाणी आज एकूण 200 ज्येष्ठ नागरिकांना आज लस देण्यात आली आहे .अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वेता कुलकर्णी यांनी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र बाकटी येथे कुपोषित बालकांसाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर मनोज डोंगरवार यांचेकडून कुपोषित व गरजू बालकांना औषधांचे वाटप करण्यात आले. यापूर्वीही गरोदर माता ज्या अति जोखीम असलेल्या आहेत,त्यांना स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर नाफडे यांनी वैद्यकीय सल्ला दिला, पोषक आहार व औषध याबाबतही गरोदर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले होते. गरोदर मातांची कोरोना तपासणी व रक्त तपासणीही करण्यात आली आहे.
कोरोना लसीकरण यशस्वी करण्यासाठी डॉ.स्वेता कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, डॉ. कुंदन कुलसुंगे परिचारिका राऊत,कोडापे,लोहारे,
आरोग्य सेवक शेंडे, आरोग्य सहाय्यक साखरे यांनी यावेळी सेवा दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र बाकटी अंतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिकांची तसेच परिसरातील ग्रामवासीयांची नियमित कोरोना आरटीपीसीआर तपासणी केली जाते.परिसरातील महिला पुरुषांचा तपासणीला व लसीकरणा ला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.