घरकुल लाभार्थ्यांना लगतच्या घाटावरून विनामूल्य रेती द्या
माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांची मागणी
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.28.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना भंडारा जिल्ह्यातील लगतच्या रेती घाटावरून रेती उपलब्ध करून देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शासकीय धोरणानुसार घरकुल बांधकाम लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देशित केलेले आहे. परंतु अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पर्यावरण विभागाच्या सूचनेनुसार एकही घाट रेती करिता उपलब्ध नाही. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना अवैध रेती तस्करांकडून दुप्पट किंमतीने सहा हजार रुपये प्रति ब्रास रेती खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे जनसामान्य गरीब लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे. तसेच रेती न मिळाल्यामुळे कित्येक घरकुलांचे बांधकाम रखडलेले आहे. अशा परिस्थितीत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दिघोरी, सानगडी, सासरा या भंडारा जिल्ह्यातील लगतच्या रेती घाटावरून प्रत्येकी पाच ब्रास रेती उचल करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी आज दिनांक 28 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी गोंदिया यांना ई-मेल द्वारे एका निवेदनातून माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केली आहे.