नांदेड:दि.2- शंकर नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात मुंबईच्या लोखंडवाला कॉम्लेक्स मधून 15 वा आरोपी पकडून आणला आहे.खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याने जवळपास 20 लाख रुपये बँक घोटाळ्यातील विविध आरोपीना वळती करून दिले आहेत.
शंकर नागरी सहकारी बँकेचा 14 कोटी 46 लाख रुपयांचा घोटाळा त्यांच्या आयडीबीआय बँकेतील खाते हॅक करून करण्यात आला. याबाबतचा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल आहे.या प्रकरणातील सर्वाधिक गुन्हेगार नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहेत.पण पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या कुशल नेतृत्वात बँक घोटाळ्याकडे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,विशेष तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड यांचेही भरपूर लक्ष आहे.सोबतच नांदेड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि अनेक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मेहनत घेत आहेत. कारण पोलीस विभाग एक टीम वर्कच असते.
या गुन्ह्यात आज पंधरावा गुन्हेगार विमानतळ पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.जाधव आणि पोलीस कर्मचारी लोखंडे आणि बालाजी केंद्रे यांनी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधून पकडून आणला आहे. त्याच्याकडे कर्नाटक बँकेचे धनादेश पुस्तक,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बनावट क्रेडिट कार्ड आणि अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे सापडली आहेत.आज सकाळी पकडून आणलेल्या अभिजित अंदानी शेट्टी (45) यास वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बँक घोटाळ्यात पकडलेला हा 15 व्या क्रमांकाचा आरोपी आहे.
नांदेड पोलीस दलातील अनेक पोलीस पथके अद्याप देशातील विविध भागातील राज्यांमध्ये या प्रकरणातील आरोपींचा माग काढत आहेत.289 बँक खात्यांमध्ये बँकेतील रक्कम वळती झालेली आहे.बँकेचे खाते विक्री करण्याचा नवीन प्रकार या गुन्ह्यांमुळे समोर आला आहे.