नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे हे चौथै वर्ष असून दि २७/०२/२०२१ रोजी काश्मीर कॉन्फरन्स हॉल, म्हाडा कॉलनी, अमरावती रोड, नागपूर येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे १३ पुस्तकाचे प्रकाशन व राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे संपादित 'आम्ही हायकूकार' प्रातिनिधिक कविता संग्रह व काव्यदर्पण, जीवन संग्राम, बहिणाबाई, बकुळगंध, अंतरीच्या वेदना, काव्यसृष्टी, प्रवरेची फुले या कविता संग्रहासोबत, शब्दसुमने, शोधतो मी स्वत:ला या चारोळी संग्रहाचे तसेच कधी तू, मनमोहिनी, या ललित लेखसंग्रहाचे ही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनात राज्यातील निवडक ५० निमंत्रित कवी आपल्या काव्यरचनांचे सादरीकरण करणार असून या प्रकाशन समारंभास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाट्यलेखक दादाकांत धनविजय, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल सोले, सचिन गावखडकर, मुंबई, मयूर निमजे, सह आयुक्त डॉ अंकुश केदार, डॉ. अनिल पावशेकर, डॉ. बबन नाखले, प्रा. आनंद मांजरखेडे, मोहम्मद जहीर, प्रवीण मुधोळकर, झेनिथ जवादे, विश्वस्त अशोक लांडगे, अरविंद उरकुडे, मुख्य सचिव पल्लवी पाटील उपस्थित राहणार आहेत.
कवी संमेलनात सहभागी सर्व कवींना 'साहित्य सेवा सन्मान' २०२१ सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठीचे शिलेदार संस्थेच्या सभासदांनी या प्रकाशन समारंभ व कवी संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष संस्थापक राहुल पाटील यांनी केले आहे.