निप्पॉंन डेन्ड्रोच्या जागेवर नवीन प्रकल्पासाठी ना शरदचंद्रजी पवार यांच्याशी खासदार बाळू धानोरकर व पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांची सकारात्मक चर्चा
चंद्रपूर : गेल्या २६ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली ११८३. २३ हेक्तर नवीन अद्यापावेतो कोणताही प्रकल्प न झाल्याने हि जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहे. उपरोक्त संपादित जमीन निप्पॉंन डेन्ड्रोच्या नावाने असून सध्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या ताब्यात आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. याच जमीनीवर नवीन प्रकल्प व्हावा यासाठी ना. शरद पवार यांची खासदार बाळू धानोरकर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार दिल्ली येथे भेट घेतली. येथील पायाभूत सुविधा व जमिनींबाबतची माहिती ना. शरद पवार यांना खासदार बाळू धानोरकर यांनी जमिनीच्या व प्रकल्पाच्या संबधी फाईल दिली. यावेळी मा. शरदचंद्र पवार यांनी लवकरच नवीन प्रकल्प उभारण्याकरिता उद्योगपतींसोबत संवाद सोडून लवकरच एक नवीन रोजगारयुक्त प्रकल्प उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली.
योगायोगाची गोष्ट म्हणजे या वीज प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान नरसिहराव यांच्या हस्ते झाले होते. व त्यावेळेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ना. शरद पवार हे सुद्धा त्या कार्यक्रमास उपस्थित होते. या जागेवर ऊर्जा, पोलाद किंवा इतर कोणताही मोठा उद्योग आणण्यासाठी स्वतः खासदार बाळू धानोरकर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी साकडे घातले असता, निप्पॉंन डेन्ड्रो वीज प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या कागदपत्रांची फाईल खा. धानोरकर यांनी दिली. काही महिन्याआधी खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्य मुंबई येथे मा. शरदचंद्र पवार यांना भेटून या प्रकल्पासंबंधी माहिती दिली होती. त्यावेळी जमिनीच्या व प्रकल्पाच्या संबधी फाईल तयार कारण्याकरीता सांगितले होते. आज हि संपूर्ण फाईल त्यांना दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पिपरी, ढोरवासा, तेलवासा, कुंनाडा, टोला, चारगाव, विजासन, लोणार रिठ, रुयाल रीठ व चिरादेवी या गावातील हद्द शेतकऱ्याची ११८३. हेक्टर शेतजमीन सन १९९४-९५ मध्ये निप्पॉंन डेन्ड्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. गेल्या २६ वर्षांपासून उपरोक्त जमिनीवर कोणताही प्रकल्प नाही. जमीन पंडित आहे. संपादित क्षेत्राची अंदाजे लांबी ३५०० मीटर व रुंदी १५०० मीटर आहे. भद्रावती शहरापासून सदर जागा सात कि. मीअंतरावर आहे.
मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात कोळसा, वर्धा नदीचे मुबलक पाणी, रेल्वेची मुख्य लाईन, वीज साठविण्यासाठी जवळच असलेले पॉवर ग्रीड, जवळूनच गेलेल्या कचा दाबाच्या विद्युत वाहिन्या या पायाभूत सुविधा या ठिकाणी आहे.
या ठिकाणी प्रकल्प झाल्यास भद्रावती परिसरातील रोजगार निर्मिती होऊ शकते तसेच बाजारपेठेवर सुद्धा सकारात्मक परिणाम होऊ शकते. या प्रकल्पामुळे या परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्यामुळे हा प्रकल्प त्वरीत करण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ना. शरद पवार यांच्याकडे केली.