नाशिक : येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करत कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या लिलाव प्रक्रियेनंतर संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेली उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया जरी संपूर्ण झाली असेल. मात्र, येवला तालुक्यातील कातरणी येथील अकरा सदस्य ग्रामपंचायत बिनविरोध करत हनुमान मंदिरासाठी 11 ते 21 लाख रुपयांदरम्यान लिलावाची बोली लागल्याची ऑडिओ क्लिप तक्रारदाराने निवडणूक आयोगाकडे सादर केली.
निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले. निवडणूक आयोगाला तपासादरम्यान तथ्य आढळून आल्याने निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, भारतीय दंड विधानाचे प्रकरण 9-अ नुसार, अथवा अन्य कायद्यातील तरतुदीनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या कारवाईचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
मोहन सोनवणे यांनी याप्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत हा मोठा निर्णय घेतला. यामुळे बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत