नागपूर - बहुजन नायक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची १२१ वी जयंती नागपूर विधानभवन प्रांगणात रविवारी (ता. १०) सकाळी १० वाजता साजरी होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डॉ नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार, बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रवीण कुंटे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे व कन्नमवार प्रेमींच्या उपस्थितीत विधानभवन प्रांगणात असलेल्या दादासाहेब कन्नमवार यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कन्नमवार दिनदर्शिका २०२१ चे विमोचन करण्यात येणार आहे. तसेच कन्नमवारांच्या विचारधारेला सोबत घेऊन चालणा-या समाज, दिव्यांग, समाजकारण, पत्रकारिता व कला क्षेत्रातील पाच समाजव्रतींचा सत्कार करण्यात येणार आहे. तदनंतर कार्यक्रम स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन बेलदार समाज संघर्ष समिती व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, खिमेश बढिये, विनोद आकुलवार, मिलिंद वानखेडे, दिनानाथ वाघमारे, राजू चव्हाण, किशोर सायगन, विनायक सुर्यवंशी व समितीतर्फे करण्यात आले आहे