Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ०८, २०२१

मी पाहिलेल्या "शुभांगीताई भडभडे"

शंकर जाधव
7875015199


मी पाहिलेल्या "शुभांगीताई भडभडे "

आदरणीय शुभांगीताई ह्या माझ्या आदर्श व्यक्तिमत्व आहेत.आपण कोणाचे कोणीच नसतो. पण आपलं मात्र काहीतरी ऋणानुबंध असतो. म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रूपात ही नक्कीच होते.एकदा शुभांगीताईच्या भेटीचा योग आला. बोलणं झालं , संवाद झाला , चर्चा झाली, मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि मी भारावून गेलो. त्यांचा साधेपणा, स्वाभाविकता, प्रांजळपणा , अतिशय सभ्य, दयाळू ,संयमी, हळवं आणि संवेदनशील मन , मोकळा स्वभाव. साधी राहणी, चांगली भुमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणार्या शुभांगीताई नेहमी आठवणीत राहतात. मोगर्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो.मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. आपण व्यक्तिच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. स्वभावात गोडवा, शालीनता , विनयशीलता, प्रामाणिकपणा असल्याने त्यांची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी हवीशी वाटते. ज्या व्यक्तिमधे विचार क्षमता असते ती आयुष्यात नेहमी यशस्वी होतात. गोडवा जीभेवर असेल तर सारेच धावून जातात. बोलण्यात आदब, चेहर्यावर प्रसन्न हास्य , दिलखुलास स्वभाव, जीभेवर सरस्वती आरूढ , असं ताईंच प्रभावी व्यक्तिमत्व नजरेस येतं.
त्यांची कार्यकरण्याची एक वेगळी पध्दत आहे.सर्वांशी मिळून मिसळून, त्यांना वाव ,संधी देऊन त्यांच्याकडून कार्यक्रम यशस्वी करून घेऊन त्यांनी पद्मगंधाच्या अनेक उपक्रम राबविले.गेल्या 27 वर्षात अनेक कवी- कवयित्री, लेखक-लेखिका, नाट्य लेखिका, कादंबरीकार कथालेखक तयार केलेत. पद्मगंधाच्या या वाटचालीत ' अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन,आणि रौप्य महोत्सवी वर्षात पद्मगंधा मराठी साहित्य संमेलन थाटात संपन्न केले. पद्मगंधा प्रतिष्ठानाच्या चार साहित्य संमेलन स्मरणिकेतचे संपादन देखील केले. अनेक कलाकारांना पद्मगंधा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले. जेष्ठ कलावंत दिलीप प्रभावळकर , सुधिर गावस्कर ,अॅड. उज्वल निकम इ. अनेक नामवंत कलाकरांना गौरवित केले. कोरोनाच्या काळात देखील विविध उपक्रम आॅनलाईन त्यांनी राबविले. वाचन , लेखन, निबंध स्पर्धा, लेख कथा, कविता स्पर्धा ,अभिवाचन, मराठी साहित्य सामान्य ज्ञान, विविध साहित्य प्रकार घेत गेले. पद्मगंधातिल लेखिकांनी केलेले नाटकं नाट्यमहोत्सवात केली गेलीत. मला वाटतं महाराष्ट्रात किंवा भारतात अशी ही एकमेव नाटक संस्था असावी. ह्या सर्व उपक्रमात त्यांच्या सहकारी सदस्या टीमने मोलाची कामगीरी करून अतिशय उत्तम सर्व उपक्रम राबविले , हेही कौतुकास्पद आहे.
      शुभांगीताई  आयुष्य जगत असतांना मर्यादेचं भान ठेवतात.काही वेळेस भावनांनचही मोल मोल ओळखतात. म्हणूनच खर्या अर्थाने आयुष्य सार्थकी लागले. जी व्यक्ति प्रत्येक गोष्ट  सदविचारानं करते तिला इतरत्र  बघायची गरज नसते. आयुष्यात नाती, माणसं जपता आली पाहाजेत तरच जगण्याला अर्थ प्राप्त होतो. नाहीतर जीवन हे रूक्ष वाळवंटा सारखं होऊन जातं . वि. स. खांडेकरांनी म्हटल्याप्रमाणे " जो दुसर्यासाठी जगला तो जगला, स्वतःकरिता जगला तो मेला" .म्हणून आयुष्य फक्त जगणं महत्वाचं नसतं तर त्यात भाव ओतुन ते  सार्थक करायचं असतं. शुभांगीताई सुध्दा माणसं, नाती ओळखतात नव्हे त्या वाचतात. त्यांच्यातील कलागुणांच अवलोकन करतात. माणसं जोडनं त्यांना आवडतात. जोडलेल्या प्रत्येक फुलांची जशी माळ तयार होते तशीच सुंदर विचारांची माणसे सुध्दा सुंदर असतात. शुभांगीताई सुध्दा याच सुंदर मालेतील एक सुंदर फुल आहे.
       शुभांगीताई एक प्रतिभावंत नामांकित साहित्यिक आहे. त्यांचा मराठी भाषेचा दांडगा अभ्यास आहे. अनेक कादंबर्या विशेषतः चरित्रात्मक कादंबर्या त्यांनो लिहिल्या. त्यांची भाषा, शैली,रचना ,मांडणी, प्रतिभा ह्यांत त्यांचा हातखंडा आहे. आईचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत.त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कादंबरीतून आपल्याला वाचतांना जाणवते.बालपणी आईने केलेल्या संस्कारातून त्यांच्या लेखनीला दिशा मिळाली.त्यांच्या आई उत्तम कथालेखिका तर मामा हे सुप्रसिध्द टीकाकार होते.लेखनाचा वारसा त्यांना माहेराहूनच लाभला.अनेक भाषातून त्यांचे साहित्य अनुवादित झाले आहे. लेखन हा त्यांचा स्वास आहे. त्या माणूस घडवतात. त्याला बोलकं करतात ,लिहतं करतात. मग ती प्रत्यक्षातली असो वा कादंबरी, नाटकातील असो. ह्या अनुभवावरच त्यांची चरित्र कादंबरीवर छाप आढळते. त्यांच्या कादंबरीत प्रयोजन असतं. प्रयोजनाशिवाय कादंबरी पूर्ण होऊच शकत नाही असं त्यांच मत आहे. चरित्र कादंबरी लेखन हा त्यांचा आवडता छंद.त्यांनी साहित्य क्षेत्रात एक आपला वेगळा ठसा उमटवला.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली साहित्याची पखरण करत रसिकांना आनंदच दिला.याशिवाय अनेक ललित लेख, प्रवास वर्णने, काव्य अशी विपूल साहित्य निर्मिती त्यांनी आजवर केली आहे. आज देखी त्यांचे लेखन  तेवढ्याच उत्साहात सुरू आहे. नुकतेच सांस्कृतिक मंत्रालय येथे फेलोशिपसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अनेक गौरवस्पर पूरस्कार प्राप्त झालेत.
           त्यांचा साधेपणा, स्वाभाविकता, प्रांजळपणा आणि एक अखंड संवादलय ही त्याच्या साहित्याची वैशिट्ये आहेत. रसिकांच्या प्रेमाबरोबर लोकमान्यता लाभलेल्या या कादंबरीकार यांना अनेक पुरस्कारांनाही गौरविण्यात आले आहे. एकापेक्षा एक चरित्र कादंबरी लिहून रसिक वाचकांच्या मनावर दीर्घकाळ मोहिनी घालणार्या कादंबरीकार शुभांगीताई आजही टवटवीत फुलासारख्या आनंदाची पखरण करतात.फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्यांच्या लेखनीलाही सुगंध आहे.त्यांचे कर्तृत्व दिवसेंदिवस दरवळत राहो, आरोग्य सुदृढ राहो , तसेच शतायुषीचे ध्येय साकार होवो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. 
-------0--------0--------------
               शंकर जाधव.
   

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.