इवल्या-इवल्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्यासमोर जगातील सारं काही लहान वाटतेय. जगातील संपूर्ण संपत्ती इवल्याशा बाळाच्या हास्याने काहीच कामाची नाही, अशी भावना तयार होते. हे सत्य आहे. इवल्याशा बाळाच्या गोंडस कृतीमुळे दुःख विसरण्याची किमयाही साधली जाते. पण, नियतीपुढे कुणाचं काहीच चालेना... शॉर्ट सर्किटमुळे होरपळून दहा निरागस, निष्पाप मुलांचा जीव गेल्याची अतिशय क्लेशदायक घटना भंडारा येथे घडली. घटनेमुळे आईचा टाहो काळजाला छेदून चिरत गेलाय...आणि ममतेच्या भोवती काळोखाने विळखा घातलाय.
'ति'ला तिच्या बाळांचा मंजुळ किलबिलाट ऐकून जगाला जिंकण्याची शक्ती हळूहळू काबीज करायची होती. पण, सारंच गळून पडलंय अन होत्याचं नव्हतं झालंय. जणू काही काळ दबा धरून बसला होता काय? असा प्रश्न पडावा इतकी भयावह काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडलीय. या घटनेनी पायाखालची जमीनच सरकली. आनंद होत असताना काळाने घाला घातला. हसत्या-बाळगत्या कुटुंबाच्या जीवनात हा काळ राख कालवून गेलाय. ही रात्र पटकन सरो म्हणून पापणी लावणाऱ्या आईलाही कधी वाटलं नसेल की, आपल्याला उद्यापासूनची सकाळ आपल्या तान्हुल्याविना जगावी लागेल. आपल्याला इतक्या दुःखाच्या खाईत लोटलं जाईल, अशी कल्पनाही 'ति'ने केली नसेल. घरात बाळाचे आगमन होण्याची चाहूल लागताच चोहीकडे आनंदमय वातावरण तयार होते. घरात, कुटुंबात प्रसन्नतेचा शिडकाव जणू काही आकाशातून होत असल्याचा भास होतोय. त्या आनंदापुढे गगनही मावेनासे होतेय. चातकासारखी वाट पाहून आनंदाचे क्षण ओंजळीत साठविण्यासाठी मायेची किती धडपड सुरु असतेय. पण, नियती क्रूर रूपाने निरागस जीवांना आईची कूस न मिळण्यापासून धडपड करत होती. तो क्षण किती क्लेशदायक आणि वेदनेच्या आकांतात बुडाल्याचे पावलोपावली जाणवते. निरागस कोवळ्या मुलांना मायेच्या प्रेमापासून वंचित ठेवणारी घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे होरपळून दहा मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने सारं काही सुन्न झालंय. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आता कुठे तर कोवळ्या उमलल्या होत्या. आता कुठे तर 'त्या' मायेच्या स्पर्शाने निरागस मुलांना वाट धरून तूरतूर पावले टाकायची होती. मुलांचा सांभाळ, त्यांच्या भविष्याचा विचार हळूहळू आईच्या डोक्यात प्रवेश करीत होता. कितीतरी आंशा-अपेक्षा ठेऊन उंच भरारी घेण्याची स्पर्धा लढायची होती.मात्र, काळाने तिच्या जीवनात दुःखाचे कायमचे पीक पेरले आहे. तिच्या स्वप्नाचा चुराडा केलाय.तिने उराशी बाळगलेली स्वप्ने आता नाहीशी झाली. घटनेने त्या मायेच्या हृदयावर खोलवर जखमा कोरल्या आहेत. ज्या कधीही भरून निघणाऱ्या नाहीत. प्रत्येक क्षण आठवून काळासोबत 'ति'ला चालायचे आहे. तिला बळ देणारे हात भरपूर मिळतील. पण, तिच्या काळजाला चिरत गेलेल्या दुर्दैवी घटनेच्या आठवणींना शिवण्याचे सामर्थ्य कशातच नाही.
-मंगेश दाढे