पक्षाने आदेश दिला तर पंतप्रधान मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दिला आहे.दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आज काँग्रेसनं नागपुरात राजभवनावर आंदोलन केलं. त्यावेळी खासदार धानोरकर बोलत होते.
यावेळी धानोरकर म्हणाले की, भाजपा ही आमची पैदाईश आहे. 1907 मध्ये यांनी प्रवेश केला आणि 1925 मध्ये जन्म घेतला. ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्यापद्धतीने मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय राहणार नाही. बाळू धानोरकर महाराष्ट्रातला एकमेव खासदार नाही. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकत माझ्यामध्ये आहे. आता तीन वर्ष बाकी आहेत. या तीन वर्षाच्या कालखंडात पक्षानं आदेश द्यावा की धानोरकर जा तुम्ही वाराणसीत. जर मी गेलो नाही, लढलो नाही आणि जर नाही मोदींचा ट्रम्प केला तर नावाचा बाळू धानोरकर सांगणार नाही, असं ते म्हणाले.