मेट्रोचा नावीन्यपूर्ण पुढाकार : नागरिकांकडून स्वागत
नागपूर, ता. ९ : मेट्रोतून उतरल्यानंतर आजूबाजूला फिरण्यासाठी आपल्याला स्वत:ची सायकल हवी असेल तर नागपूर मेट्रो प्रशासनाने प्रवाशांची ती चिंताही दूर केली आहे. आता कुठलाही प्रवासी मेट्रोमधून स्वत:ची सायकल नेऊ शकतो. आपले काम आटोपून तीच सायकल घेऊन पुन्हा परत येऊ शकतो.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी यासाठी पुढाकार घेतला. नागपुरातील सर्व नागरिकांना त्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सायकलिस्टने या उपक्रमाचा लाभ घेतला. हॉक रायडर्स या सायकलप्रेमींच्या समूहाने नुकताच सीताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास सायकल घेऊन केला. खापरी येथे सायकल घेऊन उतरल्यानंतर त्यांनी मिहान परिसराची सायकल राईड केली. त्यानंतर पुन्हा सायकलसोबत मेट्रोने खापरी-सीताबर्डी असा प्रवास केला. हॉक रायडर्स सायकल समूहाचे प्रमुख अजय बन्सोड यांन याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देताना सांगितले की, महामेट्रो प्रशासनाने सायकलस्वारांसाठी केलेली ही व्यवस्था अगदी उत्तम आहे. याचा लाभ केवळ सायकल राईडर्सला होणार नाही तर शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत तुटपुंज्या पगारावर नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गालाही होईल.
मेट्रो आणि सायकलचा अधिकाधिक वापर करून नागपुरातील प्रदूषण कमी करणे आणि सायकल वापराला प्रोत्साहन देणे, हादेखिल यामागील उद्देश असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.