किसान रेल्वेमुळे शेतक-यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन
- केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म , लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
विदर्भातील संत्री , भाजीपाला यांची वाहतूक ही रेल्वे वाहतुकीद्वारे किफायतशीर दरात होत असल्याने शेतक-यांचा शेतमालावर होणारा वाहतुक खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पनात वाढ होईल आणि त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म , लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे संचालित ‘नागपूर- आदर्श नगर नवी दिल्ली’ या विशेष किसान रेल्वेद्वारे 205 टन संत्र्यांची पहिली खेप नवी दिल्ली येथे रवाना करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून नागपूर रेल्वे स्थानकावरून मार्गस्थ करण्यात आले. काटोल ,नरखेड, पांढुर्णा , बैतुल इटारसी येथे या रेल्वेचा थांबा आहे.
फळे आणि पाले-भाज्यांची रेल्वे मार्फत वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना रेल्वे वाहतुकीसाठीचे अनुदान हे वाहतूकीसाठी नोंदणी करतानांच केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने देण्याचे मंजूर केले आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये 50 टक्के सवलत शेतक-यांना मिळणार असल्याच गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केल. महाराष्ट्र शासनाने नुकतेच मंजूर केलेल्या नागपूरमधील ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पामुळे नागपुरातील कामठी, कन्हान, हिंगणा यासारखी गावे तसेच भंडारा, वर्धा यासारख्या शहरांमधून सुद्धा कृषिमाल वाहतूक मेट्रो द्वारे होण्यास मदत होईल . या ब्रॉडगेज मेट्रोचे संचालन रेल्वेच्या नेटवर्कवरच होत असल्याने अधिकाधिक गावे, शहरे यातून कृषी- माल वाहतूक करु शकतील, असे त्यांनी यावेळी सांगितल.
कृषी- माल वाहतूक नोंदणीसाठीच्या मध्य रेल्वेच्या ‘संत्रा किसान रेल्वे’ वेबसाईटचे सुद्धा लोकार्पण यावेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या किसान रेल्वेला जास्तित जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी विदर्भातील खासदार , आमदार यांना या रेल्वेच्या फायद्याबद्दल जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
विदर्भात पिकणारी फ़ळे , भाजीपाला हा विदेशात निर्यात करण्यासाठी रेल्वेने ‘रेफ्रिजरटेड’ कोचेसच्या माध्यमातून एक व्यवस्था वर्धा येथील ड्राय पोर्ट येथे करुन द्यावी ज्यामार्फत जे.एन.पी.टी. तूनसुदधा सदर कृषीमाल निर्यात करता येईल, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली. विदर्भात वर्षभर संत्रा उपलब्ध राहण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था उभारण आवश्यक आहे .यासाठी रेफिजरटेड कोचची व्यवस्था रेल्वेने करावी. शेतक-यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक संघ अर्थात फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तर्फे सुद्धा संत्रा वाहतूक देशभर करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे असेही, गडकरी यांनी यावेळी सुचविलं.
या कार्यक्रमाप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने ,वर्धाचे खासदार रामदास तडस , राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.