· सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो निर्माण कार्य जलद गतीने सुरु
नागपूर ०७ ऑक्टोबर:* महा मेट्रोच्या रिच - ४ चे कार्य ८७% पूर्ण झाले आहे. रिच ४ करिता लागणारा शेवटचा सेगमेंट (मेट्रो रेल्वे रुळाचा ढाचा) पूर्ण तयार झाला असून २३९३ व्या क्रमांकाचे सेगमेंट आज प्रजापती नगर येथे बसविण्यात आले. महा मेट्रोचे चार टप्यात निर्माण कार्य सुरु असून रिच - १ आणि रिच - ३ मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु करण्यात आली असून उर्वरित स्टेशनचे कार्य अंतिम टप्यात आहे. रिच ४ ( सिताबर्डी ते प्रजापती नगर ) या ८. ३० किमीच्या मार्गावर ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे.
मुख्य म्हणजे सदर मार्गिकेवर सुमारे १६.०० की.मी. (अप अँड डाऊन लाईन) मधिल १०.०० कि.मी. एवढ्या मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे व २९२ पियर पैकी २८१ पियरचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील आनंद टॉकीज येथे २३१ मीटर लांबीच्या पुलाचे निर्माण कार्य सुरु असून भारतीय रेल्वेच्या ट्रॅक वर १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रॅक वरून राहणार आहे.
या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.