चौकशी अहवाल म्हणजे खोदा पहाड निकला चुहाॅ
देशमुख यांची प्रतिक्रिया
चंद्रपूर/खबरबात:
मागील आमसभेत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक जन विकास सेनेचे अध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी क्वारंटाईन सेंटरवर भोजन पुरवठाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.तसेच या गैरव्यवहारामुळे महानगरपालिकेला 100 दिवसात 60 लक्ष रुपयांचा फटका बसलेला असून पुढील काळात करोडो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा आरोप करून त्यांनी या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती.
मात्र महापौर यांनी उपायुक्त विशाल वाघ यांच्या मार्फत या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.आज झालेल्या आमसभेत देशमुख यांनी महापौर राखी कंचर्लावार यांना भोजन घोटाळ्याच्या चौकशी बाबत विचारणा केली. महापौर यांनी चौकशीचा अहवाल वाचण्याचे निर्देश मनपाचे लेखा निरिक्षक गोस्वामी यांना दिले.सभागृहात मनोज गोस्वामी यानी वाचलेला अहवाल ऐकल्यावर देशमुख यांनी 'खोदा पहाड निकला चुहाॅ' अशी तुलना केली.
मुळात सहज कॅटरर्स तर्फे एप्रिल-मे महिन्यात कमी दरात भोजन,चहा,बिस्किट,पाणी बाॅटल पुरविण्याचे काम सुरळीत सुरू असतांना तात्काळ ऑफलाईन निविदा काढून चढ्या दराने काम का देण्यात आले ? याबाबत समाधानकारक उत्तर महापौर राखी कंचर्लावार यांना देता आले नाही.पारले-जी चा २ रूपये किंमतीचा बिस्किट पुडा एमऱआरपी पेक्षा जास्त दराने भारतात कुठेही विक्री व खरेदी करता येत नाही.परंतु चंद्रपूर मनपाने २ रू.चा पुडा ५ रू.ला व ५ रू.चा पुडा ८ रू.ला खरेदी करण्याचा विक्रम केला.अशा प्रकारे प्रत्येक वस्तुची अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करण्यात आली.
आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात आलेला असुन सत्ताधारी या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करित आहेत असा आरोप करून देशमुख यांनी सभात्याग केला व महानगर पालिकेपुढे मुंडन आंदोलन केले.यावेळी नगरसेवक दिपक जयस्वाल,प्रदिप डे तसेच जन विकास सेनेचे घनश्याम येरगुडे,देवराव हटवार,मनिषा बोबडे,अक्षय येरगुडे,आकाश लोडे,गीतेश शेंडे,सचिन भिलकर,अमोल घोडमारे ,सतिश येसांबरे,कविता अवथनकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंडन केल्यानंतर देशमुख यांनी महापौर राखी कंचर्लावार यांना एक निवेदन देऊन सत्ताधार्यांच्या भूमिकेचा निषेध केला व उच्चस्तरीय चौकशीची मागणी लावून धरली.