स्वच्छतेकडे आरोग्य व स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष
महिनाभरापासून डास प्रतिबंधात्मक फवारणी नाही.
राजुरा/ प्रतिनिधी
कोरोना संकटकाळात राजुरा शहरात डेंग्यूचे थैमान सुरू आहे. मागील महिनाभरापासून शहरांमध्ये वेगवेगळ्या वार्डात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. मात्र स्वच्छतेकडे व डास प्रतिबंधात्मक फवारणीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे.
वार्डातील खुल्या प्लॉटवर असलेले घाणीचे साम्राज्य व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे अस्वच्छता हे डास पैदास करण्यास कारणीभूत ठरले आहे. वार्डात नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे व फवारणी नसल्यामुळे वार्डात डेंगू ची साथ प्रचंड प्रमाणात असलेली आहे.मात्र नगर परिषदेचा आरोग्य व स्वच्छता विभाग अजूनही सुस्त आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरले आहे.स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.
मागील काही आठवड्यापासून वार्ड नंबर एक देशपांडे वाडीत रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक हे उपनगराध्यक्ष आहेत. मात्र या प्रभागातील दोन्ही नगरसेवक येथील समस्यांकडे लक्ष देण्यास अपयशी ठरले आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात त्यांना स्वारस्य नाही. त्यामुळे या भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या भागामध्ये खुले प्लाट मोठ्या संख्येने असल्यामुळे घाणीचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे . स्वच्छतेकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या भागातील नाल्यांची सफाई नियमित होत नाही. पावसाळ्यात डास प्रतिबंधक फवारणी होत नाही.वर्षभरातून एकदाच नाल्यांची सफाई केली जाते. सांडपाण्याचा निचरा नियमित होत नाही. या भागात बांधण्यात आलेले नाली बांधकाम सदोष आहे त्यामुळे सांडपाणी साचून राहते व घाणीचे साम्राज्य तयार होते. पुरपिडीत क्षेत्र असलेल्या या भागांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा झालेल्या नाहीत. रस्ते ,ओपन स्पेस सौंदर्यीकरण, विद्युत पथदिवे याची प्रतीक्षा अजूनही काही भागांमध्ये आहे. भागातील सांडपाणी वाहून नेणारे नाल्या यांची स्वच्छता नियमित होत नाही.शिवाय डास प्रतिबंधात्मक फवारणी झालेली नाही .नाल्यांच्या बाजूंना प्रचंड प्रमाणात गवत वाढलेले आहे. उघड्या प्लॉटवर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.शहरातील सांडपाणी वाहून नेणारी मोठी ड्रेनेज याच वॉर्डातून नाल्याकडे जाते. ड्रेनेज पूर्णपणे खुली असल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. कुठल्याही प्रकारची फवारणी होत नसल्यामुळे डासांची पैदास प्रचंड वाढली आहे. मागील आठवडाभरापासून देशपांडे वाडीत मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत मात्र डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व मच्छरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या प्रभागांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. नाल्या गटारे उघडे आहेत. त्यावर कुठलीही फॉगिंग फवारणी नाही. नाल्यांच्या सभोवताल कचरा वाढलेला आहे. त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात आहे. यावर आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने वार्डात तात्काळ स्वच्छता अभियान राबवावे व डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.