नागपूर- मागील सत्रात 16 मार्च पासून बंद पडलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षणात खंड पडू नये याकरिता शासनाने "शाळा बंद पण शिक्षण सुरू" दररोज अभ्यासमाला सोशल मीडियावर पाठवून ती शिक्षकांपर्यंत पोहचवून त्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी केंद्रप्रमुखांना ऑनलाईन वेबिनार द्वारे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे.
पण त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याने प्रत्यक्ष अनुभव, गृहभेट व कृती आराखडा तयार करून शिक्षकांनी किती विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्गदर्शन केले याबाबतची माहिती व्यवस्थापनाच्या वर्ग पहिली ते बारावीच्या शिक्षकांना एका गुगल लिंकवर भरण्याचे शासनाने आदेश बजावले आहे.
यासाठी शिक्षकांना आधी युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागणार असून मोबाइल नंबर च्या साह्याने प्रत्येक वेळी लॉगिन करून माहिती भरावी लागणार आहे.
सदर आदेशामुळे शिक्षकांना आता टाळाटाळ करता येणार नसून नियमित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.
" राज्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा ज्यामध्ये प्रती शिक्षक 10 ते 15 विद्यार्थी असतात व जे शिक्षक ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष गृहभेट करू शकत नाही अशा शिक्षकांनी आळीपाळीने शाळेमध्येच विद्यार्थ्यांना किमान दोन तास शिकविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे त्याशिवाय विद्यार्थी शिकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे."
- शरद भांडारकर
राज्य सरचिटणीस