कोविड सेंटरमधील उपायोजनांचा घेतला आढावा, अनेक महत्वाच्या सुचना
कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातलगांमध्ये उपचाराबाबत संभ्रम आहेत. ते दुर करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना सहानुभुतीपूर्वक वागणूक देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा, रुग्णांच्या नातलगांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपलब्ध करुन देणारी व्यवस्था उभी करत रुग्णांसह रुग्णांच्या नातलगांचेही समाधान करणारी सेवा या कोविड सेंटरच्या माध्यमातुन देण्यात यावी असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाला दिले. आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कोविड – १९ बाबत बैठक घेत परिस्थिचा आढावा घेतला यावेळी त्यांनी कोविड सेंटरचीही पाहणी केली. यावेळी वैद्यकिय शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा रक्त संक्रमन अधिकारी डॉ. अनंत हजारे यांच्यासह इतर डॉक्टर व अधिका-यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामूळे आरोग्य व्यवस्था अपूरी पडण्याची भिती व्यक्त केली जात होती. दरम्याण आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कोविड सेंटरची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेत अधिका-यांना महत्वाच्या सूचना केल्यात. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा परिणाम नक्कीच आरोग्य व्यवस्थेवर झाला आहे. असे असले तरी मात्र सेवा भावणेतून या रुग्णांना योग्य वागणूक दिल्या गेली पाहिजे. हा संसर्गजन्य रोग असल्याने रुग्णांजवळ रुग्णांच्या नातलगांना थांबण्यास मनाई आहे. त्यामूळे उपचाराबाबत रुग्णांच्या नातलगांमध्ये शंका निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातलगांना सदर रुग्णाच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती पूरविणारी सक्षम व्यवस्था उभी करण्यात यावी, या व्यवस्थेच्या माध्यमातून रुग्णांची सध्यास्थिती, ऑक्सिजन लेवर, त्यांना झालेले इंन्फेक्शन व त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराबाबत अवगत करण्यात यावे, बेडची संख्या वाढविण्यात यावी, रुग्णांना त्यांच्या नातलगांशी मोबाईलद्वारे बोलण्याची मुभा देण्यात यावी, काही वार्ड शिफ्ट करुन ते ऑक्सीजनची सोय असणाऱ्या वार्डात रुपांतरीत करण्यात यावे, कोरोना संशयीत रुग्णांची तात्काळ चाचणी करून त्यांचा अहवाल ताबडतोब देण्यात यावा, कोरोना तपासणी केलेल्या रुग्णांचा अहवाल २४ तासात देण्यात यावा व त्याची रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केल्यात.