■ 250 हून अधिक शिबिरार्थी घेणार भाग
नांदेड-
किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 7 ते 14 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यात दोनशे पन्नासहून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी दिली.
प्रा.डॉ. शैलजा बरुरे ह्या शिबिराचे उदघाटन करणार असून अमर हबीब हे समारोपाचे व्याख्यान देणार आहेत.
हे शिबिर गुगल मीट या अँपवर दररोज सायं 7 ते 8.30 या वेळात होईल.
या शिबिरात सुभाष कच्छवे (परभणी) हे सिलिंग कायदा, बालाजी आबादार (नांदेड) आवश्यक वस्तू कायदा, ऍड.अनंत बावणे (लातूर) जमीन अधिग्रहण कायदा समजावून सांगतील. परिशिष्ट 9 व अन्य शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या बद्दल ऍड. डी.एस. कोरे (लातूर-पुणे) हे विवेचन करणार आहेत. तसेच नितीन राठोड (उस्मानाबाद) हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची रणनीती अर्थात किसानपुत्र आंदोलन यावर बोलतील. 'सर्जकांचे स्वातंत्र्य' या विषयावर सौ.संगीता देशमुख (वसमत) मार्गदर्शन करणार आहेत.
मयूर बागुल (अंमळनेर-पुणे) व अंकुश खानसोळे (नांदेड) हे शिबिराचे संयोजक असून तांत्रिक सहयोग असलम सय्यद (आंबाजोगाई-पुणे) करणार आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातुन शिबिरार्थीं भाग घेत आहेत.
■ लॉकडाऊनच्या काळात किसानपुत्र आंदोलनाने एक महिन्याची व्याख्यानमाला चालवली तसेच एक अनोखी व्हिडीओ स्पर्धाही घेतली. त्या पाठोपाठ राज्य स्तरीय शिबिर घेतले, त्या पाठोपाठ मराठवाडा विभागीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. असेच विदर्भ विभागीय शिबिर ऑक्टोबर मध्ये होणार आहे. - मयूर बागुल