मानापूर, कन्हाळगाव येथे शिबिरांचे आयोजन
कन्हाळगाव येथील व्यसन उपचार शिबिरात सहभागी झालेले नागरिक.
आरमोरी/चामोर्शी, ता. ६ : मुक्तिपथ अभियानद्वारे आयोजित दोन शिबिराच्या माध्यमातून ३२ जणांनी उपचार घेऊन व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला. आरमोरी तालुक्यातील मानापुर, चामोर्शी तालुक्यातील कन्हाळगाव येथे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चामोर्शी तालुक्यातील कन्हाळगाव येथे आयोजित व्यसन उपचार शिबिराचा १२ व्यसनी रुग्णांनी लाभ घेतला. अरुण भोसले यांनी दारूचे व्यसन कसे दूर करावे, दारूचे दुष्परिणाम आदी संदर्भात रुग्णांचे समुपदेशन केले. शिबिराचे नियोजन संयोजक छत्रपती घवघवे, मुक्तिपथ चमू विनायक कुनघाटकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे पदाधिकारी व गावक-यांनी सहकार्य केले.
आरमोरी तालुक्यातील मानापुर येथे गावसंघटनेच्या मागणीनुसार व्यसनउपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकूण २० रुग्णांनी शिबिराला भेट देऊन दारू सोडण्याचा संकल्प केला. संयोजक प्रभाकर केळजरकर, समुपदेशक प्राजू गायकवाड यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले . शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलिस पाटील ऋषी मोहूर्ले, तंटामुक्त समिती अध्यक्ष घनश्याम साखरे व गाव संघटनेच्या महिलांनी सहकार्य केले. शिबिराचे नियोजन तालुका उपसंघटक प्रकाश कुनघाटकर यांनी केले.