अहिंसक कृती करताना देलोडा (बू) गावसंघटनेच्या महिला.
आरमोरी, ता. २९ : तालुक्यातील देलोडा (बु) - सूर्यडोंगरी जंगल परिसरात दारू भट्ट्या सुरु असल्याची माहिती मिळताच देलोडा (बु) येथील गाव संघटनेच्या महिलांनी जंगलपरिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार शोधमोहीमे दरम्यान जवळपास तीन चुंगळ्या मोहसडवा नष्ट करण्यात आला. तसेच सडवा टाकण्यासाठी नेत असलेला दोन चुंगळ्या मोहफूल जप्त करून ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आला.
सूर्यडोंगरी येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्रेते आहेत.यामुळे दारूबंदी असलेल्या गावांतील मद्यपी या गावाकडे धाव घेत असतात. देलोडा (बु) येथे गाव संघटनेच्या महिलांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे वर्षभर दारूबंदी कायम होती. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात शेतीचे कामे सुरु झाल्यामुळे गाव संघटनेच्या महिला व्यस्त झाल्या. या संधीचे सोने करीत अनेक दारूविक्रेत्यानी छुप्प्या मार्गाने दारूविक्री सुरु केली. यामुळे गावातील मद्यपींना पुन्हा सहजतेने दारू उपलब्ध होऊ लागली. परिणामी कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडत असून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.गाव संघटनेच्या महिलांनी गावातील दारूविक्रीवर बंदी घालण्यासाठी अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार देलोडा (बु) - सूर्यडोंगरी जंगल परिसरात शोधमोहीम राबवून जवळपास तीन चुंगळ्या मोहसडवा नष्ट करीत हातभट्ट्या उध्वस्त केल्या. तसेच सडवा टाकण्यासाठी नेत असलेला मोहफूल जप्त करून ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आले. यावेळी गावातील पोलीस पाटील, तंमुस अध्यक्ष, मुक्तीपथ तालुका चमू, गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.