एटापल्ली, ता. २९ : दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणा-यांवर उपचार करण्यासाठी मुक्तीपथ अभियानाद्वारे गाव पातळीवर एक दिवशीय व्यसन उपचार शिबीरे घेतल्या जात आहेत. या शिबिरांना दुर्गम भागातही उत्तम प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून अनेक मद्यपी दारूमुक्त झाले आहेत. तालुक्यातील दुर्गम अशा पंदेवाही म. ( पूनागुडा ) येथे नुकतेच शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये एकूण १२ रुग्णांनी उपचार घेऊन दारू सोडण्याचा निर्धार केला आहे.
पंदेवाही म. येथे गावाच्या पुढाकारातून व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १२ रुग्णांवर उपचार करून १५ व्यसनी रुग्णांना समुपदेश करण्यात आले. दरम्यान सर्च चे उपसंचालक तुषार खोरगडे व मुक्तीपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी शिबिराला भेट दिली. यावेळी गावक-यांशी आदिवासी भागातील जीवनमान, दारूचे व्यसन, त्याचे दुष्परिणाम यासंदर्भात चर्चा केली. तसेच दारूचे व्यसन उपचाराने बरा होतो असे सांगत दारू न पिण्याचे आवाहन केले.
या शिबिरासाठी गाव पाटील दिवाकर तलांडे, गजानन ईष्टाम, मुख्याद्यापक रमेश गोडसेलवार, अंगणवाडी सेविका अनिता तलांडे यांनी सहकार्य केले. या शिबिराचे नियोजन तालुका संघटक किशोर मल्लेवार यांनी केले. यावेळी समुपदेशक साईनाथ मोहुर्ले, संयोजक पूजा येलूरकर उपस्थित होत्या.