गडचिरोली: राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्यानंतर आणि जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी पिक कर्ज वाटपासंबंधात जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरी पुढाकार घेतलेला असतांना जिल्हाभरात बँकांकडून शेतकऱ्यांना विविध कारणे देवून ऐन रोवण्याच्या वेळेस चकरा मारायला लावण्याचे प्रकार सुरू आहेत. हा प्रकार तात्काळ बंद करून चार दिवसांत पिक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात यावे.अन्यथा बँकांच्या गडचिरोली येथील जिल्हा शाखांसमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई व्हावी यासाठी ढोल बजाओ आंदोलन करुन बँकांच्या अडेलतट्टू धोरणांचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी दिली आहे.
तसेच कर्जमाफी संबंधातील प्रक्रिया संबंधित गावाच्या तलाठी यांनी केली नाही,त्यामुळे नव्याने कर्ज देता येत नाही. मागील कर्जाची व्याजाची रक्कम शासनाकडून बँकेला देण्यात आली नाही, त्यामुळे कर्ज मंजुरीसाठी वेळ लागत आहे, असे एक ना अनेक कारणे देवून शेतकऱ्यांना बँका परत पाठवत आहेत. त्यामुळे आधीच पावसाच्या लहरीपणामुळे आणि लॉकडावूनच्या परिस्थितीमुळे मेळकुटीस आलेले शेतकरी हतबल होत आहेत. हा प्रकार सध्याच्या पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात योग्य नसून आता चार दिवसात जिल्हाभरातील बँकांनी शेतकऱ्यांना कोणत्याही कारणाविना कर्ज रक्कम प्राप्त करून द्यावी, अन्यथा बँक प्रशासनाच्या अडेलतट्टू कारभाराचा निषेध आणि शेतकऱ्यांना नागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई व्हावी यासाठी ७ तारखेला शुक्रवारी गडचिरोली येथील सर्व जिल्हा बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी दिला आहे.