चंदनवेली, येनगाव येथे तंबाखूबंदीचा घेतला ठराव
गडचिरोली, ता. २८ : एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली तर धानोरा तालुक्यातील येनगाव येथील गाव संघटनेतर्फे तंबाखू विक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही गावांमध्ये पार पडलेल्या बैठकींत 'कोरोनामुक्तीसाठी तंबाखूविक्री बंदी' असा गावाने ठराव घेतला असून तंबाखूमुक्त गाव करण्याचा निश्चय केला आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा गावात शिरकाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी दोन्ही गावांतील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी वर्षभरासाठी पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी चंदनवेली,येनगाव येथे गाव संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोरोना विषाणूचा शिरकाव ग्रामीण भागात सुद्धा झाला असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळले पाहिजे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे गावामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे आवश्यक आहे. यासंदर्भात दोन्ही गावातील बैठकींमध्ये चर्चा करण्यात आली.
'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' व 'सुगंधित तंबाखूविक्री बंदी कायदा' यानुसार संपूर्ण राज्यात तंबाखू व सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असणे गरजेचे आहे. मात्र, कायद्यांचे उल्लंघन करीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरुच आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे तंबाखू विक्रीवर बंदी घालणे महत्वाचे आहे. सदर बाब गावक-यांच्या लक्षात येताच दोन्ही गावांतील नागरिकांनी ठरावावर स्वाक्ष-या करून तंबाखूमुक्त गाव, कोरोनामुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.