नागपूर,(खबरबात):
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण ) च्या नंदनवन उपविभागात कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन चिरकुटराव जयस्वाल यांना नागपूर विद्यापीठाकडून विद्युत अभियांत्रिकी मध्ये नुकतीच पीएचडी प्रदान केली असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
"वितरण ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरल्या जाणार्या रिमोट कंडिशन मॉनिटरिंग सिस्टमसाठी डेटा आधारित मॉडेल " हा गजानन जयस्वाल यांच्या संशोधनाचा विषय होता . श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अँड मॅनॅजमेन्ट येथे त्यांनी संशोधनासाठी नोंदणी केली होती. संशोधन काळात त्यांचे शोध प्रबंध आयईईई, आयईटी या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले.त्यांनी ११ उच्च दर्जेच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला आहे तसेच संशोधन विषया संदर्भात रिअल टाइम प्रॉडक्ट यावर त्यांचे एक पेटेंट मान्य झाले असून उर्वरित दोन पेटेंट मान्यतेसाठी पाठवलेले आहे . गजानन जयस्वाल यांनी एम.टेक (आयपीएस) आणि एमबीए (मार्केटिंग आणि फायनान्स ) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते मागील २० वर्षांपासून विद्युत क्षेत्रात कार्यरत आहेत
गजानन जयस्वाल यांना व्हीएनआयटीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. मकरंद बल्लाळ तसेच श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अँड मॅनॅजमेन्ट नागपूरच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. धनंजय आर. तुटकाने यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गजानन जयस्वाल यांचे नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि महावितरणचे अधिकारी-कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे