आमदार किशोर जोरगेवार यांचे रेल्वे मंत्री यांना पत्र
२०१९ पासून भरती प्रक्रिया प्रलंबित
रेल्वे विभागाची २०१९ ची भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याने रेल्वेतील विविध विभागात अनेक जागा रिक्त आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी पाहता रेल्वे विभागाने या रिक्त जागा भरण्यासाठी तात्काळ भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.
रेल्वे विभागाच्या आरआरबी एनटीपीसीची च्या परीक्षा जून ते सप्टेंबर २०१९ ला तर आरआरसी ग्रुप डी साठीच्या परीक्षा सप्टेंबर ते ऑक्टोंबर २०१९ ला होणार होत्या. मात्र अद्यापही या परीक्षा घेण्यात आलेल्या नाही. परिणामी रेल्वे विभागातील विविध विभागात ३५ हजार २७७ पदे रिक्त आहे. तर आरआरसी ग्रुप डी च्या जवळपास १ लाख ३ हजार ७६९ जागा विविध झोनमध्ये भरणे आहे. मात्र या भरती परीक्षेला विलंब होत असल्याने सदर परीक्षांसाठी अर्ज करणारे लाखो उमेदवार आता या दोन्ही ऑनलाईन पूर्व परीक्षेची प्रतीक्षा करीत आहेत. देशावर कोरोनाचे धोकादायक सावट असल्याने या जागा भरल्या जाणे शक्य नव्हते. मात्र आता हळूहळू देशातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. संपूर्ण देश आता अनलॉक प्रक्रियेकडे वळत आहे. त्यामुळे या परीक्षा घेणे शक्य असल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे. मध्यंतरी कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली असून युवकांमध्ये निराशा पसरली आहे. हि बाब लक्षात घेता रेल्वे विभागाची प्रलंबित भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी अशी मागणीही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पाठवलेल्या पत्रातून आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.