महापौरांना सहभागी होण्याची विनंती
नागपूर, ता. १७ : कोव्हिडच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनपूर्वीच सर्वात अगोदर जिम बंद करण्याचे आदेश सरकारने दिले. या आदेशाचे पालन काटेकोरपणे करण्यात आले. मात्र, मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी दिली. जिम अद्याप सुरू करण्यात आले नाही. कोव्हिडशी लढा देण्यासाठी व्यायाम उपयुक्त असून तातडीने जिम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी जिम व्यावसायिकांतर्फे १९ ऑगस्ट रोजी संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात जिम मालकांनी महापौर संदीप जोशी यांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे. दारुची दुकाने, केश कर्तनालय व अन्य व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. जिम हा व्यवसाय व्यायामाशी संबंधित आहे. जिम मालक कोव्हिडसंदर्भातील सर्व नियम पाळण्यास तयार असतानाही अद्याप जिम सुरू करण्यास परवानगी का देण्यात आली नाही, याबाबत महापौर संदीप जोशी यांनी आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भात तीन दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांना पत्र लिहून जिम सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याची सूचना केली. मात्र अद्यापही शासन स्तरावरून अथवा स्थानिक स्तरावरून जिमबाबत निर्णय झाला नाही. तीन दिवसांपूर्वी महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात जिम मालक आंदोलन करू शकतात, याबाबत पूर्वकल्पना दिली होती. त्यानुसार आता जिम मालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून १९ ऑगस्ट रोजी संविधान चौकात ते आंदोलन करणार आहेत. जिम सुरू व्हावे, याचे महापौर संदीप जोशी यांनी समर्थन केले असल्यामुळे या आंदोलनात जिम मालकांच्या समर्थनार्थ महापौरांनी उपस्थित राहावे, अशी विनंती जिम मालकांनी महापौरांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी (ता. १७) महापौरांची भेट घेतली. महापौर संदीप जोशी यांनी आंदोलनात उपस्थित राहण्याचे आश्वासन जिम मालकांना दिले.
यावेळी सुधीर अभ्यंकर, सचिन मातने, स्वप्नील वाघुले, रोहित शाहू, ज्ञानेश्वर नंदनवार, केतन साठवणे, दिनेश चावरे उपस्थित होते.