कांतीलाल कडू यांनी हॉस्पिटल प्रशासनाला फोन करताच रुग्णाच्या बँक खात्यात परताव्याची रक्कम झाली जमा!
...........................................
पनवेल/प्रतिनिधी
सरकारने लागू केलेल्या दर प्रणाली प्रमाणेच देयकाची रक्कम आकारली आहे. गैर असे काही नाही. आपण कुठेही चौकशी करू शकता असा ठामपणे दावा करणाऱ्या नवी मुंबई कोपरखैरणे येथील एका हॉस्पिटल प्रशासनाची समजूत काढत सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर काही तासातच रुग्णाच्या बँक खात्यात तब्बल 75 हजार रुपयांचा परतावा जमा झाला. कडू यांचा दरारा पाहून लुटारु डॉक्टरांना धडकी भरल्याचा हा आणखी एक पुरावा समोर आला आहे.
नवी मुंबईतील एका प्रथितयश हॉस्पिटलमध्ये उरण पूर्व भागातील तीस वर्षीय तरुणावर कोविड उपचार सुरू होते. एका बड्या नेत्याच्या संपर्कातून त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल केले होते. 13 दिवसानंतरही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवले.
दरम्यान, नवी मुंबईतील त्या हॉस्पिटल प्रशासनाने पन्नास हजार रुपयांची अनामत रक्कम परत केली. तर विमा संरक्षण कवचातून साडेतीन लाख रूपये उकळले होते.
यासंदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या कानावर कैफियत घातली.
कडू यांनी हॉस्पिटल प्रशासनानाकडून रुग्णावर केलेल्या उपचारांची पूर्ण माहिती अतिशय नम्रपणे घेतली. त्यानंतर बिलाच्या रकमेबाबत त्यांना विचारून सरकारी देयकानुसार ते बिल नसल्याचे कडू यांनी पटवून दिल्यावर प्रशासन ठामपणे दावा करू लागले. कुठेही बिल दाखवा आम्ही गैर नाही आहोत. असेही आव्हान त्यांनी कडू यांना दिले. मग कडू यांनी अतिशय सौम्य भाषेतून युक्तिवाद करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर काही तासातच हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या बँक खात्यात तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची परताव्याची रक्कम परस्पर निमूटपणे जमा केली.
कांतीलाल कडू यांच्या एका फोनवरून आणखी एका कोविड रुग्णाला न्याय मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत. तर खासगी लुटारु डॉक्टरांबद्दल समाजात तीव्र नापसंती वाढत चालली आहे.