चंद्रपूर १९ जुलै - चंद्रपूर शहरात प्रशासनद्वारे कडकडीत टाळेबंदी लागू करण्यात आलेली आहे. रस्त्यांवर शुकशुकाट जाणवतोय व यातून दिसुन येतोय चंद्रपूरकरांचा कोरोनाला दूर सारण्याचा निर्धार. याच कालावधीत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे कर्मचारी सातत्याने संपूर्ण शहरात ' डीप क्लीनिंग ' मोहिम प्रभावीपणे राबवित आहेत.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे युद्धस्तरावर सफाई मोहीम राबविली जात आहे. याकरीता ' डीप क्लीनिंग ' ॲक्शन प्लॅन तयार करून मोहिमेचा नियमित पाठपुरावा महापौर सौ. राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्याद्वारे घेण्यात येत आहे. दर आठवड्याला याचा अहवाल स्वच्छता निरीक्षकांद्वारे देण्यात असून शहर नियमित स्वरूपात संपूर्ण स्वच्छ व्हावे याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
' डीप क्लीनिंग ' मोहीमेअंतर्गत नाली सफाई, गाळ उचलणे ,रोड झडाई, फॉगींग, फवारणी, सफाई व निर्जंतुकीकरण असे एक संपुर्ण स्वछता अभियानच राबविले जात आहे. दरदिवशी सहायक आयुक्तांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात स्वच्छता निरीक्षकांद्वारे स्वच्छता पथके बनविली जातात. ही पथके शहराच्या विविध भागात संपुर्ण स्वछता मोहीम राबवितात. शहरातील प्रत्येक वार्ड, झोनमधे नियोजनबद्धरीत्या स्वच्छता करण्यात येत आहे.
या आपात्कालीन परिस्थितीत चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य व सफाई कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. शहर निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाद्वारे युद्धस्तरावर सम्पूर्ण शहरात फवारणी, धुरळणी, आवश्यक ठिकाणी निर्जंतुकीकरण नियमीत सुरू आहे.