रणझुंजार पिलाजीराव जाधवराव वाघोली.
________________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________________
सिंदखेड येथील राजे लखुजीराव जाधवराव यांचा इतिहास सांगणारे व धनाजीराव जाधवराव यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची परंपरा कायम राखणारे रणझुंजार पिलाजीराव जाधवराव यांचा लष्करातील पहिल्या दर्जाचे बिनीचे योद्धे म्हणून ऊल्लेख केला जात.पिलाजीराजे जाधवरावांचा 3 जुलै 1751 हा स्मृतिदिन.
पिलाजीराव जाधवराव यांच्या वडिलांचे नाव चांगोजीराव तर आईंचे नाव हंसाई होते.चांगोजीराव जाधवराव यांच्या कडे वाघोली जि.पुणे येथील पाटीलकीचे वतन चालत आले होते.श्रीमंत सुभेदार पिलाजीराव बिन चांगोजीराव जाधवराव हे एक अष्टपैलू आणि कर्तबगार व्यक्तिमत्व असणारे रणझुंजार सरदार होते.पिलाजीराव जाधवराव हे बाजीराव पेशवे व चिमाजी आप्पा यांचे युध्द शास्रातील गुरू होते.
छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थानात खूप सक्रिय होते .तेथे जवळजवळ प्रत्येक वर्षी स्वारी करून मुलुक आणि खंडणी प्राप्त करून घेत असत. पिलाजीराव जाधवराव हे या हालचाली मधील एक अग्रणी सरदार होते. त्यांनी अनेक स्वाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे .छत्रपती शााहूराजांना व येसूबाई राणीसाहेब यांना मोगलांच्या कैदेतून सोडवून आणण्यात पिलाजीराव जाधवराव यांचा मोठा सहभाग होता.
जंजिरा, सिद्धी ,बाणकोट ,गोवळकोंडा ,या मोहिमेवर पिलाजीराव जाधवराव अग्रस्थानी होते
सन.1730 मध्ये वसईची मोहीम झाली, त्या मोहिमेत पिलाजीराव जाधवराव अग्रस्थानी होते .या मोहिमेचे नेतृत्व पिलाजीराव जाधवराव यांनी केले होते .या मोहिमेत वसईवर विजय मिळवूनच पिलाजीराव जाधवराव मागे फिरले .माळवा ,बुंदेलखंड ,उत्तर हिंदुस्थान, सुरत ,भेलसा, प्रयाग ,बंगाल ,नेवासे इथपर्यंत त्यांनी मजल मारून.स. 1742 मध्ये बंगाल प्रांताची चौथाई छत्रपती शाहू महाराजांना मिळवून दिली.
औरंगजेबाच्या कैदेतून सुटून छत्रपती शाहूमहाराज महाराष्ट्रात आले, तेव्हा पिलाजीराव जाधवरावांनी त्यांना अत्यंत सहाय्य केले .त्यामुळे छत्रपती शाहूमहाराज व पेशवे या दोघांचाही पिलाजीराव जाधवराव यांच्यावर अत्यंत लोभ जडला. दक्षिणेतील विस्कळीत झालेल्या मराठा साम्राज्याची घडी बसवण्यात पिलाजीराव जाधवराव यांचा मोठा वाटा होता. स.1711 मध्ये सेनापती चंद्रसेन जाधव यांच्या कडून बाळाजी विश्वनाथ पराभूत झाले असता पांडवगडाच्या लढाईत पिलाजीराव जाधवराव यांनी बाळाजी व त्यांच्या कुटुंबास सोडवले .याप्रसंगी पहिले बाजीराव पेशवे अवघे बारा वर्षाचे होते. पिलाजीराव जाधवराव यांचा हा पराक्रम बाजीरावांनी जवळून पाहिल्यामुळे बाजीरावांचे त्यांच्यावरील प्रेम शेवटपर्यंत टिकून राहिले. पुढे पेशवे व निजाम यांचे बिनसले असता औरंगाबाद प्रांत कब्जात आणण्याचा खुद्द बाजीराव पेशव्यांनी खूप प्रयत्न केला ,परंतु त्यांना यश आले नाही .शेवटी ही जोखीम पिलाजीराव जाधवराव यांनी स्वतःहून अंगावर घेतली व घोड्याला उलटी नाल मारून दोन महिने घोड्याची खोगीर न उतरता पिलाजीराव जाधवराव यांनी औरंगाबादवर वसुल बसवला .याबद्दल सुमारे दीड लक्ष रुपयांचा मुलुख बाजीराव यांनी पिलाजी जाधवरावांना छत्रपती शाहूमहाराजांकडून घेऊन दिला
स.1717 मधे हिंगण गावच्या दमाजी थोरात यांचे बंड मोडून काढून दमाजींना कैद करून छत्रपती शाहूमहाराजांसमोर आणून उभे केले .या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती शाहूमहाराजांनी पिलाजीराव जाधवरावांना पुणे प्रांतातील मौजे दिवे ,मौजे नांदेड ही गावे इनाम दिली .पिलाजीराव जाधवराव यांनी औरंगाबाद प्रांतावर जरब बसवून वसुलीची कायमची व्यवस्था लावून दिली.मोगला विरुद्ध निजाम आणि मराठे यांनी संयुक्तपणे केलेल्या युद्धामध्ये व दाखवलेल्या पराक्रमामुळे पिलाजीराव जाधवराव यांना जलादत्त इन्कलाब म्हणजे रणशूर किंवा शौर्य क्रमाचे मर्मज्ञ अशा उपाधीने गौरवले.
स.1729 मध्ये बाजीराव पेशवे छत्रसालाच्या मदतीला गेले त्यावेळी पिलाजीराव जाधवराव त्यांच्याबरोबर होते .या युद्धात त्यांनी शत्रूचा पराभव केला.या युद्धातील पराक्रमामुळे छत्रसाल राजाने पिलाजीराव जाधवरावांना सागर प्रांतातील मोठी जहागिरी दिली. स.1737 मध्ये चिमाजी आप्पाने पोर्तुगीजां विरुद्ध काढलेल्या यशस्वी मोहिमेचे पिलाजीराव जाधवराव नेतृत्व करत होते.शाहूछत्रपती व पेशव्यांच्या तीन पिढ्यांच्या कारकिर्दीत पिलाजीराव जाधवराव यांनी सतत पन्नास वर्ष उत्तर व मध्य हिंदुस्थान ,बंगाल ,कोकण ,कर्नाटक, आणि फिरंगण्यातील अनेक युद्ध मोहिमेत मराठ्यांचे नेतृत्व केले.युद्धप्रसंगी शाहूमहाराज नेहमीच पिलाजीराव जाधवरावांच्या बरोबर सल्लामसलत करत असत. मध्य हिंदुस्थानात अनेक जहागिऱ्या मिळूनही त्यांनी महाराष्ट्रात वास्तव्य करून हुजारातीच्या सैन्याचे शेवटपर्यंत नेतृत्व केले.प्रखर राज्यनिष्ठा ,स्वराज्यप्रेम, असामान्य शौर्य, अध्यात्मवृत्ती ,मुत्सद्देगिरी हे गुण पिलाजीराव यांच्यामध्ये पुरेपूर भरले होते .
चाकण परगण्यातील गोलेगाव व मरगळ ही दोन गावे इनाम छत्रपती शाहूंमहाराजांनी जाधवरावांना इनाम म्हणून दिली .पेशवे जरी शुरपणे नेतृत्व करत होते तरी ,ह्या पराक्रमी कार्याचे व शौर्याचे मर्म जाणणारा सूत्रधार म्हणजेच पिलाजीराव जाधवराव हेच होत.छत्रपती शाहूमहाराज यांच्या काळात मराठी राज्याचा जो विस्तार झाला त्या यशाचे फार मोठे वाटेकरी म्हणून पिलाजीराव जाधवरावांचे नाव घ्यावे लागेल .पिलाजीराव जाधवराव यांची कामगिरी मागे टाकून मराठे शाहीच्या इतिहासाची पाने ऊलटू शकणार नाहीत .तीन जुलै स.1751 मध्ये पिलाजीराव जाधवराव काळाच्या पडद्याआड गेले.त्यांची समाधी पुणे जिल्ह्यात वाघोली येथे आहे
"अशा या महान पराक्रमी वीराला स्मृतीदिनानिमित्त आमचा मानाचा मुजरा "