नागपूर(खबरबात):
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःला एनएनएससीडीसीएलचे सीईओ असल्याचे सांगून जो गैरकारभार केला त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका महापौर संदीप जोशी आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी संयुक्तपणे जिल्हा व सत्र न्यायलयात दाखल केली.
या याचिकेवर १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःला एनएनएससीडीसीएल अर्थात स्मार्ट सिटी प्रकल्प कंपनीचे सीईओ असल्याचे सांगून संचालक मंडळाला विश्वासात न घेता अनेक निर्णय घेतले. एखादा प्रकल्प रद्द करणे, कर्मचाऱ्याना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे या एकतर्फी निर्णयासोबतच बँकेची दिशाभूल करीत आपली स्वाक्षरी घुसवून एका कंपनीचे 20 कोटींचे पेमेंट केले. कंपनीचे अधिकृत सीईओ नसताना केलेले हे व्यवहार आर्थिक गैरप्रकारात मोडणारे असल्यामुळे कंपनीचे संचालक तथा महापौर संदीप जोशी आणि संचालक तथा सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी २२ जून रोजी यासंदर्भात सदर पोलिस ठाण्यात कलम १५६ (३) अंतर्गत तक्रार केली.
आठ दिवसात काहीही चौकशी झाली नसल्याने तक्रारकर्ते महापौर संदीप जोशी आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी ३० जून रोजी पोलिसांना स्मरणपत्र दिले. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. ५ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेने तक्राकर्त्याना गमतीदार पत्र पाठविले. सदर तक्रार पोलिसांशी संबंधित नसल्याने ती एनएनसीडीसीएल कडे पाठविण्यात येत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
चोराने केलेल्या चोरीची तक्रार आपल्याशी संबंधित नसल्याचे सांगून पोलिसांनी ती चोराकडेच पाठविली, म्हणून आम्ही आता न्यायालयात न्याय मागणार असल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले. सामान्य नागरिकांविरोधात तक्रार आल्यास अगदी दुसऱ्याच क्षणी गुन्हा नोंदविणारे पोलिस राजकीय दबावात तर नाही ना, अशी शंका महापौर संदीप जोशी यांनी उपस्थित केली. बँकेची दिशाभूल करून आर्थिक व्यवहार करणारे तुकाराम मुंढे यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी निःपक्षपणे व्हावी, यासाठी आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असल्याचे त्यांनी सांगितले.