आज जागतिक पर्यावरण दिनाचाही योगायोग
संजीव बडोले
प्रतिनिधी/ नवेगावबांध
नवेगावबांध दिं.5 जून:- सालाबादा प्रमाणे यावर्षी सुद्धा 5 जून रोज शुक्रवारला वटपौर्णिमेनिमित्त कोरोनाव्हायरसचे कुठलेही भय न ठेवता, मोठ्या उत्साहाने सामाजिक अंतर राखत गावातील वटवृक्षाखाली येथील सुवासिनींनी उपवास ठेवून, वटवृक्षाची पूजा केली.हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
येथील बालाजी मंदिर परिसरात सकाळपासूनच सुहासिनी हातात आरती धरून वटवृक्षाची पूजा करण्यासाठी घरून बाहेर पडल्या होत्या. कुंभार मोहल्ला, माऊली मोहल्ला, इंदिरानगर व गावात ज्या ठिकाणी घराजवळ वटवृक्ष असेल त्याठिकाणी महिलांनी वटवृक्षाची पूजा उत्साह व भक्तिभावात केली. सुहासिनी च्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कुठेही त्या कोरोनाव्हायरस च्या भयाखाली आहेत असे वाटत नव्हते. एवढा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. आजचा योगायोग असा की आज जागतिक पर्यावरण दिवसही होता.निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.