चंद्रपूर(खबरबात):
कोरोना विषाणू संसर्ग काळात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे सलून तसेच ब्युटीपार्लर व्यावसायिकांना प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी नाही. मात्र खासगी इमारतीमध्ये या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्या इमारतीच्या मालकांना भाडे वसुलीची सक्ती न करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात आज एक व्हिडिओ संदेश चंद्रपूरवासीयांसाठी जारी केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील व चंद्रपूर शहरातील ज्या खासगी इमारतीमध्ये सलून किंवा ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी आपले दुकान थाटले असेल, मात्र गेल्या काही दिवसात लॉकडाऊन मुळे हा व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. तथापि, व्यवसाय बंद असल्यामुळे काही ठिकाणी किराया थकीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर मालकांनी या काळात या व्यावसायिकांना किराया देण्यासाठी तगादा लावू नये. तसेच सक्ती करून त्यांना रूम खाली करण्यास सांगू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केली आहे.
व्यवसाय सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने किराया वसुली करावा, असेही त्यांनी सुचविले आहे. तसेच या काळात कोणत्याही इंन्डोर किंवा मैदानी खेळाला मान्यता देण्यात आली नसून क्रीडांगणावर अशा पद्धतीच्या खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये. सामुहिक व्यायाम करणे किंवा क्रीडांगणाच्या वापर करणे देखील चुकीचे असून याला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.