मी म्हटल्याने कोरोना काही जाणार नाही. तुझे असं माणसाच्या सानिध्यात वास्तव्य करणे आता खटकत आहे. एका शब्दात सांगायचे झाल्यास तुझा कंटाळा अन जाम राग, वैताग आलाय. अनेकांचं जीवन उध्वस्त केलंय तू...आता तू जिथून आला होता तेथे परत जा... तेथेच तुझ्यावर निसर्गमयरीत्या अंत्यसंस्कार व्हावेत... काय जीवन चाललं होतय...पार वाटोळं केलंय तुने... चांगलीच दानादान केलीय.
च्यायला तू आला.. त.. आला.. पण गरिबांचे हाल केलेय. तुने माणसाचे दुःख नाही समजले. आधीच पिचलेल्या, दबलेल्या, आर्थिक चणचण असणाऱ्यासाठी तू कर्दनकाळ ठरलाय. तूला दया नाही, तूने माणुसकी सोडली, तुने पाप केलंय, तू असा कसा दगडाचा झालाय? तुझ्याकडे बघताना दगडालाही पाझर फुटेल...परंतु तुला कसा नाही...कारण तुझ्याकडे ती किमयाच नाही... कुठेतरी सौम्य हो... आम्हाला पण जगू दे.. आता पुरे झाले तुझे नाटक,तू जो हैदोस मांडला..तो भयभीत आणि अफाट वेदना देणारा आहे. तू आणखी किती जणांचा बळी घेशील? किती जणांना संसर्ग करशील? तू असा कसा कठोर आहे?
आता आमच्या बळीराजाचे शेतीच्या कामाचे दिवस. तुझ्यामुळे ज्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली, त्यांचे सावरण्याचे दिवस. आता आम्ही हतबल झालोय. चोहीकडे निराशा पदरी पडली. तुने आमचे व्यवसाय, उद्योग बुडविले, नोकऱ्यावर संक्रात आणली, हाती आलेला घास हिरावला...तुला काही वाटते की नाही? च्यायला इतकं पाप कुठे भरणार? तुझ्या पापाचा घडा फुटेल? आत्मा रडवतोय तू... हृदयाला हेलावून टाकलंय... पायाखालची जमीन सरकली आमच्या. तू काहीही कर बाबा.. आता चालता हो... बस्स..तुला संपविनारे औषध पण लवकर येईना...तुझा प्रभाव दिवसागणिक वाढतच आहे..आतापर्यंत असं वाटत होत की, कमी रोगप्रतीकारक शक्ती असणाऱ्यांना लवकर पकडतो. पण तू कमी-जास्त कुणालाही पाहत नाही.
जो भेटला त्याला दंश करतोय आणि पुढे-पुढे चालतोय.तू असा कसा क्रूर आहे. तुझे काटेरी रुप पाहून धडकी भरतेय. तू आधीही नको होता आणि आता पण. तुझे दिवस भरले.. तू जा.. अनेकांच्या जीवनात सुखाचे अंकुर फुलू दे... हा प्रवास आणखी सुंदर होऊन समृद्ध वाटचालीसाठी मोकळा श्वास घेऊ दे!!!
- मंगेश दाढे