चंद्रपूर १० जुन - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या उपहारगृहे, खाद्यगृहांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सुचना असतांना ग्राहकांना दुकानाच्या आत बसण्याची व्यवस्था करणाऱ्या शहरातील कॅफे मद्रास व रसराज हॉटेल या प्रतिष्ठानांवर बुधवार १० जुन रोजी मनपा पथकातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन यापुढेही अश्या स्वरूपाची कारवाई सुरु राहणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी शासनातर्फे पुर्णवेळ लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. दरम्यान परिस्थिती पूर्वपदावर यावी याकरीता मागील काही दिवसांपासुन यात शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते ५ यावेळेतच दुकाने सुरु ठेवण्यात येत असून उपहारगृहे, खाद्यगृहे, घरगुती खानावळ, स्वीट मार्केट, फरसान सेंटर, चहा नाश्ता सेंटर हे केवळ पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अटीवर सुरु करण्यात आले आहे. प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई आहे. अश्या स्वरूपाचे शासनातर्फे स्पष्ट निर्देश असतांनाही काही उपहारगृहे, खाद्यगृहे, हॉटेलचालक ग्राहकांना दुकानाच्या आत बसून नाश्ता, जेवण करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.
कोरोना आजार संपर्कातून पसरू शकतो, त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अतिशय अनिवार्य आहे. त्यादृष्टीने दुकानमालकांनी ग्राहकांना केवळ पार्सल द्यावे, ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नये, एकावेळी ५ पेक्षा अधिक लोकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, फिजिकल डिस्टंसिंग - दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर पाळावे, विहित वेळेत दुकाने सुरु व बंद करावे, पूर्णतः स्वच्छता राखावी यासारख्या अटींचे पालन करावयाचे आहे. मात्र काही उपहारगृहे, खाद्यगृहे, हॉटेलचालक या सुचनांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कारवाई करण्यात येत आहे. कारवाईनंतरही नियमांचे पालन होत नाही असे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.
कारवाई प्रसंगी अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत व इतर कर्मचारी उपस्थित होते