Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून १०, २०२०

कोरोना नियम न पाळणाऱ्या प्रतिष्ठानांवर मनपाची कारवाई





चंद्रपूर १० जून - वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ६ दुकानांवर ७ दिवसांच्या बंदीची कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. बुधवार ९ जून रोजी स्वतः आयुक्त राजेश मोहीते यांच्या नेतृत्वात मनपा पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुकानांची पाहणी केली. याप्रसंगी काही दुकानदार व ग्राहक मास्क न घालता आढळले तर काही प्रतिष्ठानांत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्या जात नसल्याकारणाने त्यांच्यावर दंड तसेच बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी शासनातर्फे पुर्णवेळ लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. दरम्यान परिस्थिती पूर्वपदावर यावी याकरीता मागील काही दिवसांपासुन यात शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते ५ यावेळेतच दुकाने सुरु ठेवण्यात येत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. एकावेळी ५ पेक्षा अधिक लोकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, फिजिकल डिस्टंसिंग - दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर पाळावे, विहित वेळेत दुकाने सुरु व बंद करावे, पूर्णतः स्वच्छता राखावी यासारख्या अटी या लॉकडाऊन शिथिलता काळात पाळण्याचे दुकानदारांवर बंधन आहे. याबाबत मनपातर्फे वारंवार सूचना देण्यात आल्या आहे, मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने आयुक्त राजेश मोहिते यांनी काही प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष तपासणी करून कडक कारवाई केली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता न पाळणा-या व स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात घालणा-या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवितानाच लॉकडाऊनचे नियम न पाळणा-या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी मोहिम मनपाने हाती घेतली आहे. त्यानुसार विविध नियमांचे भंग करणा-या व इतरांचे आरोग्य धोक्यात आणणा-या व्यक्तींना अधिक दंड आकारण्यात येणार आहे.
दुकानांमध्ये दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर राखले गेले पाहिजे व तसे मार्किंग दुकानदाराने केलेले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश आहेत. ग्राहकांकडूनही सोशल डिस्टन्स न पाळल्यास त्यांनाही दंड करण्यात येणार आहे. व्यावसायिकांनी व ग्राहकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. 

 
सदर कारवाई उपायुक्त गजानन बोकडे, नगररचनाकार आशिष मोरे, अतिक्रमण विभाग प्रमुख राहुल पंचबुद्धे, संतोष गर्गेलवार यांनी केली.

लॉकडाऊनमधे शिथिलता ही मंदावलेले आर्थिक चक्र सुरळीत करण्यासाठी दिली गेली आहे मात्र त्याचा गैरफायदा घेण्यात येऊ नये. आपल्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही, किंवा आपल्यामुळे इतरांना होणार नाही या भ्रमात कुणी राहू नये. मास्क घालणे, भौतिक दूरता पाळणे यासारख्या नियमांचे पालन व्हायलाच हवे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल - आयुक्त श्री.राजेश मोहीते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.