नागपूर/अरूण कराळे (खबरबात):
तालुक्यातील दवलामेटी येथे सात दिवसापासून पाण्याची समस्या भेडसावत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा नागरीक पाण्यासाठी वणवण भटकत आहे .त्यामुळे संचारबंदी असूनही नागरीकांचा संयम सुटला आणि दवलामेटी परिसरातील नागरीक एकत्र येत बुधवार १३ मे रोजी सकाळी ११ वाजता माजी सरपंच संजय कपनिचोर , आरती ढोके ,देवराव नेवारे ,ईश्वर राऊत ,तेजराव नेवारे ,अनवर अली शेख ,पवन धारूकर ,सौरभ टोंगसे ,सोमेश्वर झारखंडे ,सुनील यादोलकर ,तुळशीराम चंदीवाले आदीसह वाडी येथील वेणा जलाशय केंद्रात पोहचले तेथे वेणा जलाशयाच्या विरोधात घोषणा देताच अभियंता नरेश शनवारे हे कार्यालयात पोहचले .
त्यांना नागरीकांनी सांगीतले की दवलामेटीतील म्हाडा कॉलनीला पाणीपुरवठा होत नाही.नागरीक टिल्लू पंपद्वारे अवैद्य पाणी घेत आहे त्यांच्यावर आळा बसवा .नळ कनेक्शनचे पैसे घेऊन सुद्धा आजपर्यंत पाणी पुरवठा सुरू झाला नाही. असा आरोप नागरीकांनी केला . त्यावर अभीयंता शनवारे यांनी सांगीतले की प्रत्येक नागरिकांला ४० लीटर पाणी देण्याचा आदेश असतांना १०० लीटर पाणी देत आहे.
त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे .यानंतर पाणी पुरवठा सुरक्षित राहणार असे आश्वासन दिल्यावर नागरीक शांत झाले .वेणा जलाशयावर नागरीकांचा मोर्चा आलेला समजताच वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वेणा जलाशयावर पोहचले. परंतू नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसून आले होते.