मुस्लिम बांधवांनी घरीच केली नमाज अदा
संजीव बडोले/नवेगावबांध.
नवेगावबांध दिं.25. मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पवित्र सण 'रमजान ईद' आज नवेगावबांध येथे मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करून आनंदात आणि उत्साहात साजरा केला आहे. मुस्लिम बांधवांच्या वतीने फातीया पढण्यात आला. हिंदू बांधव ज्याप्रमाणे दिवाळी हा सण उत्साहात साजरा करतात त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव रमजान ईद उत्साहात व आनंदात साजरी करतात. तर येथील जामा मस्जिद येथे मौलाना सादिक रजा अब्दुल वहीम यांनी नमाज अदा केली . कोरोनाच्या सावटाखाली मज्जित मध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र न येता घरच्या घरी सामाजिक अंतर ठेवून नमाज अदा करणे पसंत केले. यंदा कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे तमाम मुस्लिम बांधव अगदी घरच्या घरी साधेपणाने हा सण साजरा केला. मागील वर्षी सारखे काढण्यात आलेल्या जूलुसाला यावेळी फाटा देण्यात आला. लॉकडाऊन मध्ये नियमांचे पालन करत मुस्लिम बांधवांनी हा सण साजरा केला. मुस्लिम बांधवांच्या या पवित्र व आनंदी सणाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रमजान ईदला, ईद उल फित्र असेही म्हणतात.आज 25 मे रोज सोमवारला नवेगावबांध येथे यंदाची ईद साध्या पद्धतीने साजरी केली जात आहे.इस्लामिक दिनदर्शिकेनुसार 10 व्या महिन्यात शव्वाल चंद्रासह रमजानचा पाक महिना संपतो असे मानले जाते. जगभरातील मुस्लिम बांधव शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या ईद सणाला ईद-अल-फितर ईद-उल-फितर आणि मीठी ईद असे ही म्हटले जाते. ईदच्या दिवशी सकाळी लोक मस्जिद मध्ये जाऊन नमाज अदा करतात. त्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांची गळाभेट घेत ईद सणाच्या शुभेच्छा देतात. परंतु यावर्षी कोरोना मुळे येथील मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज अदा करून सामाजिक अंतर राखून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी शीर खुरमा सारखे अन्य काही स्वादिष्ट पदार्थ घरात बनवले जातात. लहान मुलांना ईदी आणि गरीबांना जकात दिले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे मुस्लिम बांधवांना ईदीचा सण धुमधडाक्यात साजरा करता आला नाही. फिर खा पठाण ,अल्ताफ कुरेशी, पीर मोहम्मद सय्यद, कामु शेख, महमूद खान पठाण, रहेमत सय्यद, लाले खान पठाण, जफर अली सय्यद, फारुख पोटिया वाले, हैदरअली सय्यद, वसीम शेख, आरिफ शेख यांनी आपापल्या घरीच नमाज अदा करून व्हाट्सअप, फेसबूक, मॅसेज या समाज माध्यमातून एकमेकांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.