कंटेनमेंट झोनमधून अनधिकृतपणे
जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल
चंद्रपूर,दि.22 मे: औरंगाबाद शहरामधील कंटेंनमेंट झोनमधील होम क्वॉरेन्टाईन केलेले 2 व्यक्ती व दोन वर्षाच्या मुली सोबत कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे चंद्रपूर जिल्ह्यात आले असल्याने या 2 व्यक्तींवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन 2005, भा.द.स चे कलम 188, अन्वये दंडात्मक कारवाई तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, कलम 188, 269, 270, 271 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. औरंगाबाद शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार इतरांना होऊ नये यासाठी अनेक कंटेनमेंट झोन अर्थात प्रतिबंधक क्षेत्र प्रशासनाने केले आहेत.परंतु,औरंगाबाद शहरांमधून कंटेनमेंट झोनमध्ये असणारे 14 दिवसांचे होम कॉरेन्टाईन केलेले व्यक्ती अनधिकृतपणे कोणत्याही परवानगीशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यामध्ये आलेले असल्याचे निदर्शनास येतात बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा,असे पोलीस विभागाला कळविले. यानंतर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी परवानगी घेऊनच जिल्ह्यात प्रवेश करावा तसेच प्रवेश केल्यानंतर प्रशासनाला माहिती द्यावी व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.