Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १३, २०२०

या हंगामात धान बियाण्याची उगवण शक्ती घरीच समजून घ्या



कृषी संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला


चंद्रपूर, दि. 12 मे : सध्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बियाण्यांचा तुटवडा जाणवू नये, वेळेवर बियाणे उपलब्ध व्हावे, शेतकऱ्यांच्या पेरणीला उशीर होऊ नये याकरिता शेतकरी बांधवांनी आपल्या जवळील उपलब्ध धान बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करावा व त्यांची उगवण शक्ती तपासणे गरजेचे आहे. त्याकरिता विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही यांनी शेतकऱ्यांनी घरचे घरी उपलब्ध धान बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी व खाली दिलेल्या सूचनांचा अवलंब करावा असे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

बियाण्याची शुद्धता राखणे आणि उच्च दर्जाचे बियाणे उत्पादित करणे तसेच बिजोत्पादित बियाण्यांवर येणाऱ्या रोगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वापरण्यात येणारे बियाणे शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे असल्याशिवाय खते,पाणी, आंतरमशागत या बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळत नाही.

दर्जेदार बियाणे अनुवंशिक दृष्ट्या शुद्ध, निरोगी, रोग व किडी पासून मुक्त, समान आकार व वजनाचे, उगवण क्षमता जास्त असलेले व चमकदार असावे. धानाच्या बियांमध्ये जास्तीत जास्त 13 टक्के ओलावा पातळी असावी.

बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, आनुवंशिक आणि भौतिक शुद्धता याबाबत काळजी घेणे आवश्यक असते. जर बियाण्याची उगवण क्षमता आणि शुद्धता न तपासता बियाणे पेरणीसाठी वापरल्यास त्याची उगवण चांगली होत नाही.आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासून बियाणे पेरणी योग्य आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.


बियाण्याची उगवणशक्ती घरच्या घरी तपासण्याची पद्धत:


बियाणे यामधील बिजांकुराची जमिनीमध्ये पोषक वातावरणात परिपूर्ण रोपांमध्ये रूपांतरित करण्याच्या शक्तीस उगवणशक्ती म्हणतात.

घरी उपलब्ध असलेल्या पेरणीयोग्य बियाण्यास प्रथम चाळणी करून पाखडून स्वच्छ करावे. जेणेकरून त्यामधील वेगळ्या जातीचे, पिकांचे बियाणे, रोगट किंवा फुटके बियाणे वेगळे करणे सोयीचे होईल. स्वच्छ केलेल्या बियाण्यांमधून प्रतिनिधिक स्वरुपात नमुना तयार करून घ्यावा जेणेकरून संपूर्ण बियाण्याचे प्रतिनिधित्व होईल. त्या प्रतिनिधीक नमुन्या मधून कमीत कमी 400 बी तपासावे( प्रत्येकी 100 बियाण्यांचे 4 वेगवेगळे भाग करावे.) जर दोन जातीची पेरणी करावयाची असल्यास दोन्ही जातीचे वेगवेगळे 400 बी तपासावे. उगवणशक्ती पाहण्याकरिता या बियाण्याची उगवण क्षमता तपासावयाची आहे त्यात कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे.

जर आपल्याला घरी बियाण्याची उगवणशक्ती तपासावयाची असल्यास आपण कुंडी किंवा ट्रेमध्ये असलेल्या मातीत किंवा ओल्या वाळूत 1 ते 2 सें.मी. खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी टाकावे किंवा कुंडी अथवा ट्रे ऐवजी तागाच्या पातळ गोणपाटाचे आयताकृती तुकडे सुद्धा वापरात आणता येते.शक्यतोवर नवीनच गोणपाट वापरावे. प्रथमतः गोणपाटास पूर्ण ओले करून घ्यावे. नंतर त्यावर 10  × 10 या पद्धतीने शंभर बियाणे ठेवून घ्यावे. त्याचप्रमाणे त्यावर दुसरा त्याच आकाराचा गोंणपाटाचा तुकडा ठेवून तो गोलाकार गुंडाळावा व त्यावर रबर किंवा धाग्याने बांधून घ्यावे. उगवणीकरिता बियाणे टाकलेला गोणपाट सुकणार नाही किंवा जास्त प्रमाणात पाणी होणार याची काळजी घ्यावी. साधारणतः चार ते आठ दिवसात बियाण्याची उगवण होते. बियाण्याचे किती कोंब उगवले जे पूर्ण रोपांमध्ये परिवर्तित होऊ शकतात हे प्रथमतः मोजून घ्यावे. इतर रोपे उदा. विकृत रोपेन उगवलेले बियाणेकुजलेले बियाणे यांना बाजूला काढून ठेवण्यात यावे व चांगल्याच रोपांची गणना करून घ्यावी. अशाप्रकारे चारही नमुन्यांची सरासरी काढून बियाण्यांची उगवण शक्तीची टक्केवारी काढावी. ह्या टक्केवारी वरून आपण बियाण्यांच्या उगवणशक्ती बद्दल प्राथमिक स्वरूपात अंदाज वर्तवू शकतो.

जर आपण सुधारित धान वानांचा वापर पेरणीसाठी करीत असल्यास बियाण्यांची भौतिक व आनुवंशिक शुद्धता राखून तेच बियाणे तीन वर्षापर्यंत पेरणीकरिता वापरू शकतो. परंतु आपण संकरित  धान वानांचा वापर करीत असल्यास संकरित वाणाचे बियाणे दरवर्षी नवीन घेणे आवश्यक ठरते.

धान पिकामध्ये बियाण्याची उगवणशक्ती ही 80% असावयास पाहिजे. परंतु पाच ते दहा टक्के कमी असल्यास बियाण्यांच्या प्रति एकरी दरात दहा टक्के वाढ करून पेरणी करावी. उगवणशक्ती ही 60 टक्क्यापेक्षा जर कमी असेल तर अशा बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करण्यात येऊ नये. अशा परिस्थितीत नवीन बियाणे खरेदी करणे हा एकमेव उपाय आहे.

धान बियाण्यांची उगवण शक्ती घरच्या घरी तपासण्या करिता वापरण्यात येणाऱ्या पद्धतीचा उपयोग केल्यास नवीन बियाणे खरेदी वर होणारा अतिरिक्त खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल व पर्यायाने आर्थिक लाभ होईल, असे आवाहन सहाय्यक प्राध्यापक वनस्पतीशास्त्र डॉ.एम.आर.वांढरे व सहयोगी संशोधन संचालकविभागीय कृषी संशोधन केंद्रसिंदेवाही डॉ. उषा.आर. डोंगरवार यांनी केले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.