दुचाकीला धडक देत पाडले जमिनीवर
आरोपीमध्ये जांगोणाच्या सरपंचाचा समावेश
प्रमोद पानबुडे(वर्धा)
वन जमिनीतून वाळूची अवैध वाहतूक करणाºयांवर कारवाईसाठी गेलेल्या वनरक्षक मुनेश सज्जन याच्यावर अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना मध्यरात्री हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही-सास्ताबाद पांदण रस्ता मार्गावर घडली आहे. या प्रकरणात वडनेर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये जांगोणा येथील सरपंचाचा देखील समावेश आहे.
- जिल्ह्यात वाळू घाटाचा लिलाव झाला नाही तरीही अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू आहे. रात्रीत चालणाऱ्या या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील कोली येथे अवैध वाळू तस्करी सुरू आहे. यावर कारवाईसाठी निघालेल्या वन विभागाच्या चमुला वाळू माफियांनी रस्त्यात पकडले.
दुचाकीने वाळू माफियांचा शोध घेणाºयांमध्ये वनरक्षक मुनेश्वर सज्जन व सदाशीव माने यांचा समावेश होता. वनरक्षक कारवाईसाठी आल्याचे लक्षात येताच आरोपींनी दुचाकीला धडक देत त्यांना जमिनीवर पाडले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सोबत असलेला अतिज्वलनशील पदार्थ सज्जन यांच्या अंगावर टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. सज्जन यांनी आरडा-ओरड केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
वाळूमाफिया जिल्ह्यात सक्रिय असल्याचे पुन्हा समोर आले आहे. या प्रकरणी वनरक्षक मुनेश सज्जन यांनी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वाळू माफिया उबालू कुबडे रा. पोहणा, जांगोनाचे सरपंच तथा वाळू माफिया नीतीन वाघ रा. जांगोणा यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.