मुंबई(खबरबात):
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये गेल्या 23 दिवसांत राज्यातील 53160 वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’ तर 1583 वीजग्राहकांनी ‘एसएमएस’ सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
आधुनिक जीवनाशी सुसंगत व अत्यंत सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 'लॉकडाऊन' सुरु असल्याने ही सेवा वीजग्राहकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे.
गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या 23 दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण 1 लाख 39 हजार 751 तक्रारी महावितरणचे मोबाईल अॅप, वेबसाईट, टोल फ्री क्रमांक आदींद्वारे प्राप्त झाल्या. यापैकी 38 टक्के म्हणजे तब्बल 53160 तक्रारी वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून तर 1583 तक्रारी ‘एसएमएस’ द्वारे नोंदविलेल्या आहेत.
मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून तक्रार नोंदविणाऱ्या वीजग्राहकांची संख्या पुढीलप्रमाणे. कल्याण परिमंडलमधील 10921, पुणे परिमंडल – 8704, भांडूप- 5426, नागपूर- 4852, नाशिक- 3939, कोल्हापूर- 3701, बारामती- 2424, जळगाव- 1609, औरंगाबाद- 2014, अकोला- 2555, अमरावती- 1805, चंद्रपूर- 822, कोकण- 785, नांदेड- 1466, गोंदिया- 725 आणि लातूर परिमंडलमधील 1412 तक्रारींचा समावेश आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल द्यावा लागेल. तर ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक नाही. कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून ‘एसएमएस’द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र 12 अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्यक आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून NOPOWER हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसा ‘एसएमएस’ वीजग्राहकांना पाठविण्यात येईल. मात्र ग्राहकाने दिलेला ग्राहक क्रमांक चुकीचा किंवा अवैध असल्यास तक्रार स्वीकारली जाणार नाही. याशिवाय www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल अॅप तसेच 24X7 सुरु असलेल्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार स्वीकारण्यात येत आहे.