चंद्रपूर (ख़बरबात)
चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापुर परिसरातील सिनेमा झोपडपट्टी या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हित लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने सदर परिसर 14 दिवसांकरिता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून सदर परिसर प्रशासनाने सील केला आहे.
यामध्ये पूर्व डब्ल्यूसीएल यांची खुली जागा,पश्चिमेकडे बीएसएनएल कार्यालय परिसर, खुली जागा, दुर्गापुर-ताडोबा रोड, उत्तरेकडे श्री. पुरणलाल चौधरी ते सचिन गणवीर यांचे घरापर्यंत (वार्ड क्रमांक 3 चा भाग) तर दक्षिणेकडे वार्ड क्रमांक 2, दुर्गापूर वस्ती ज्या परिसरात कोरोना विषाणुद्वारे बाधित व्यक्ती, समुदाय या केंद्रबिंदू परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल, फिरणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे.
दुर्गापुर क्षेत्रात शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची आवश्यकता, तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका यांना मुभा राहील. तसेच तहसीलदार चंद्रपूर यांचेकडून सदर प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक सेवा पुरवठा धारकांना निर्गमित करण्यात यावे. सदरहू पास धारकांना आवश्यक सेवा पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीत पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना सामाजिक अंतर व इतर आरोग्यविषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी राहील.
सदर आदेशाच्या कालावधीत उपरोक्त क्षेत्रात पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही आवागमनास परवानगी असणार नाही. ही पूर्वपरवानगी आवश्यक सेवा पुरविणाऱ्या पासधारकांना सुद्धा लागू राहील. आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येईल.