येवला प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला, ता.३० : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. परंतु त्याहीपेक्षा कर्तव्य सुद्धा महत्त्वाचे असते.असा संदेश एका कर्तव्य दक्ष तलाठी कर्मचारी यांनी दिला आहे. विंचूर-लासलगाव येथे कर्तव्यवर असलेल्या तलाठी सागर शिर्के यांनी आपले लग्न पुढे ढकलत आधी कोरोना विरुद्धचा लढा आणि नंतर लग्न असं म्हणत त्यांनी आयुष्यातला मोठा निर्णय पुढे ढकलला आहे.त्यामुळे तलाठी यांच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.
विंचुर सजा येथे नियुक्त असलेले कामगार तलाठी सागर शिर्के यांचे लग्न नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर ) येथील ज्ञानेश्वर जाधव यांची कन्या रेणुका हिच्याशी ता. २६ एप्रिल रविवार रोजी होणार होते. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती.परंतु ह्या कालावधीत कोरोनामुळे त्यांची ड्युटी विंचुर ,लासलगाव इथं लागली.लासलगाव याठिकाणी नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तसेच याठिकाणी विलगीकरणाची सोय केलेली असल्याने डॉक्टर ,आरोग्य कर्मचारी ,पोलीस यांच्या बरोबरीनेच त्यांना सलग ड्युटी करावी लागत आहे.सध्या सुरु असलेल्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तलाठी शिर्के यांनी लग्न पुढे ढकलत लग्नापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व देत ड्युटी करत आहे.तसेच लॉकडाउन दरम्यान येथील ज्या कुटुंबांना रेशनकार्ड नाही अशा गरीब व गरजु कुटुंबांना तलाठी शिर्के यांनी स्वत: तसेच गावातील सामाजिक ,राजकीय व्यक्तींकडून जिवानावश्यक वस्तु जमा करुन गरीब कुटुंबांना वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली.
" वैयक्तिक आनंदा पेक्षा कर्तव्य महत्त्वाचे आहे.आधी लढा कोरोनाशी,लग्न नंतरही होईल.सगळ्यांनी घरीच बसा. सहकार्य करा.
सगळ्यान मिळुन कोरोनाला हारवु या आणि कोरोनापासुन देशाला वाचवु या.
- सागर शिर्के, तलाठी, विंचुर सजा.
" स्वत:चे लग्न पुढे ढकलत कर्तव्य बजावत असलेले येथील कर्तव्यदक्ष तलाठी शिर्के हे डॉक्टर ,अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी ,पोलीस यांच्या सोबत बरोबरीनं अहोरात्र काम करतांना दिसत आहे.सलाम त्यांच्या कार्याला.
- रंजित गुंजाळ,राष्ट्रवादी नेते, विंचुर