महाराष्ट्र दिन विशेष
जुन्नर / आनंद कांबळे
स्वतः क्रीडा शिक्षक नसताना केवळ खो-खो सारख्या अस्सल भारतीय खेळामध्ये रांजणी(ता.आंबेगाव) सारख्या छोट्या गावात मुलांमध्ये खो-खोची आवड निर्माण करुन त्यांच्यामधून तब्बल ७८ राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारा आणि महाराष्ट्राचे नाव देशात उज्ज्वल करणारा ध्येयवेडा प्रशिक्षक म्हणजेच संदीप चव्हाण! प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच चव्हाण यांचे हे असामान्य कर्तृत्व आहे.
संदीप निवृत्ती चव्हाण हे मुळचे पारगाव(शिंगवे) गावचे. परंतु २००२ पासून रांजणी येथील नरसिंह विद्यालयामध्ये इंग्रजीचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांना खेळाची विशेषतः खो-खोची आवड होती. परंतु शालेय-महाविद्यालयीन जीवनात त्यांना योग्य मार्गदर्शन- प्रशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्यातील खेळाडूला कधी संधी मिळालीच नाही. शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी मुलांना खो-खो खेळाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि राष्ट्रीय खेळाडू घडविण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी २00५-0६ साली गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने नरसिंह क्रीडा मंडळ या नावाने खो-खो प्रशिक्षण केंद्र सुरु केले आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनशी संलग्न केले. या केंद्राच्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण सुरु केले. हळूहळू शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या माध्यमातून तर मंडळाच्या माध्यमातून असोसिएशनच्या अनेक स्पर्धांमध्ये खेळाडू सहभागी झाले आणि चमकदार कामगिरी करुन विजेतेपद पटकावली. त्यामधून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविले. खो-खो शिवाय इतर अॅथेलेटिक्स स्पर्धांमध्येही चव्हाणसरांचे विद्यार्थी चमकले आहेत. त्यामध्ये स्नेहल जाधव ही फ्रान्समध्ये झालेल्या जागतिक शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये सहभागी झाली.
चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो च्या संघाने १६ वेळा राज्यविजेतेपद पटकावले. त्यामधून ७८ राष्ट्रीय खेळाडू झाले त्यापैकी ५२ खेळाडू सुवर्णपदक विजेते आहेत. आतापर्यंत राज्यस्तरावर १०००पेक्षा जास्त खेळाडू खेळले असून सात वेळा रांजणीच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविले आहे. राज्यस्तरावर सात खेळाडूंना तर राष्ट्रीय स्तरावर ३ खेळाडूंना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त रुपयांची शिष्यवृत्ती त्यांनी खेळाडूंना मिळवून दिली आहे.
क्रीडा क्षेत्रातील चव्हाण सरांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल झी २४ तास या वाहिनीने त्यांची 'अनन्य व्यक्तिमत्व' म्हणून निवड केली. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवात पश्चिम विभाग आयोजित गुणगौरव समारंभात आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील समर्पण संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आरोग्य व शारिरिक शिक्षण विषयाच्या राज्यस्तर अभ्यास मंडळावर तज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने 18 वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची नेमणूक केली आहे. रोटरी क्लब ऑफ मंचर च्या वतीने Service Excellence Award ने सन्मानित करण्यात आले आहे.खरोखरच ध्येयपुर्तीसाठी झपाटून काम करणा-या आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना घडविणा-या चव्हाण सरांना महाराष्ट्रदिनानिमित्त मानाचा मुजरा!
चव्हाण सरांचे उल्लेखनिय खेळाडू पुढीलप्रमाणे-
१) काजल तुकाराम भोर- 1 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग( दक्षिण आशियाई खो खो स्पर्धा)१५ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग-१५वेळा सुवर्णपदक,महाराष्ट्र संघाची कर्णधार, देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून २०१९चा 'राणी लक्ष्मीबाई पुरस्कार' विजेती. खेलो इंडिया सुवर्णपदक विजेती.
२) वृषभ शिवाजी वाघ- सुवर्ण पदक विजेता राष्ट्रीय खेळाडू, १८ वर्षाखालील वयोगटात देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून 'वीर अभिमन्यू' पुरस्कार विजेता. दहावीला ९२टक्के गुण.
३) निलम सुर्यकांत वाघ- सुवर्णपदक विजेती राष्ट्रीय खेळाडू, इयता दहावीत ९६ टक्के व बारावीत९३ टक्के गुण. दोन्हीही वर्षांत खो-खोमध्येही उत्तम कामगिरी.
४) प्रणाली बारकू बेनके- १५ राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग, १३ वेळा सुवर्णपदक,२ वेळा महाराष्ट्र संघाची कर्णधार, खेलो इंडिया सुवर्णपदक विजेती.
५) संदेश शरद जाधव- सुवर्णपदक विजेता राष्ट्रीय खेळाडू, खेलो इंडिया सुवर्णपदक विजेता.
( सर्व आकडेवारी2018-19 पर्यंतची आहे)